श्रीगोंदा (तालुका प्रतिनिधी)- शहरातील गुरुमाऊली झेरॉक्स सेंटरमधून दिनांक 11 जानेवारी 2020 रोजी दुकान मालक बापूसाहेब छगन शेळके यांच्यासोबत विश्वास संपादन करीत, दिलीप शंकर शिंदे या खोट्या नावाचा वापर करून, खरे नाव लपवित मित्राच्या स्कोडा गाडीत झेरॉक्स सेंटरमधील कॉम्प्युटर झेरॉक्स मशीन, प्रिंटर रोख रक्कम 1 लाख रुपये व एक हिरो कंपनीची नवीन पॅशन प्रो मोटरसायकल चोरून नेली होती. याबाबत गुन्हा दाखल होताच श्रीगोंदा पोलिसांनी अवघ्या आठ दिवसात आरोपीला अटक केले आहे.
11 जानेवारी 2020 रोजी या गुन्ह्यातील आरोपीचे मूळ नाव व पत्ता मिळवण्यात श्रीगोंदा पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सानप, पोलीस हेडकॉन्स्टेबल अंकुश ढवळे, मांडगे, काळे, इंगवले, देवकाते, सुपेकर यांना यश मिळाले. त्यावरून नमूद आरोपीचा शोध घेण्यात आला.
त्यानुसार आरोपी प्रसाद राजधर फसले (वय 24, रा. यशवंतनगर, पैठण, जिल्हा औरंगाबाद) यास ताब्यात घेऊन, गुन्ह्यात वापरलेली स्कोडा गाडी क्रमांक एम. एच. 04, डी. डब्ल्यू. 5534 सह झेरॉक्स सेंटरमधील चोरून नेलेली झेरॉक्स मशीन, कॉम्प्युटर, दोन नवीन मोबाईल, पॅशन प्रो. ही हिरो कंपनीची नवीन मोटर सायकल असा 4 लाख 15 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नमूद आरोपीने अनेक जणांची यापूर्वीही फसवणूक केली असल्याचे तपासात निदर्शनास येत आहे.
आरोपीवर मुकुंदवाडी पोलीस ठाणे, औरंगाबाद येथेही फसवणुकीसह इतर गुन्हे दाखल आहेत. रेकॉर्डवरील आरोपीने आणखी कुठे गुन्हे केले आहेत? याबाबत पोलिस तपास करीत आहेत.