श्रीरामपूर (प्रतिनिधी)- श्रीरामपूर शहरातील व्यवसाय सुरू करण्यात आले होते. परंतु व्यावसायिक व नागरिकांतून सोशल डिस्टन्सचा पूर्णपणे फज्जा उडाला. पालिकेने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन केले नाही. त्यामुळे प्रशासनाने श्रीरामपूर शहर पुन्हा एकदा लॉकडाऊन केले. परिणामी शहरातील रस्ते पुन्हा एकदा निर्मनुष्य झाले. काल दिवसभर शहरात शुकशुकाट होता.
प्रशासनाने नियम व अटी घालून देऊन मोठ्या कालावधीनंतर श्रीरामपूरची बाजारपेठ खुली झाली होती. मात्र, बाजारपेठ खुली झाल्यानंतर व्यावसायिक व नागरिक यांच्याकडून नियमांचे पालन झाले नाही. त्यामुळे प्रशासनाने बाजारपेठ पुन्हा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मोठ्या कालावधीनंतर लॉकडाऊनमधून सूट देण्यात यावी, अशी मागणी व्यापार्यांनी सातत्याने केली होती.
तीस प्रतिसाद देत प्रशासनाने दि. 13 मे पासून काही नियम घालून देऊन बाजारपेठ खुली केली होती. यावेळी दुकानदारांनी व पालिका प्रशासनाने गर्दीचे व इतर नियम पाळणे अपेक्षीत होते. मात्र तसे न झाल्याने शेवटी बाजारपेठ बंद करण्याचा निर्णय प्रशासनाला घ्यावा लागला. त्यामुळे शहरातील रस्ते पुन्हा एकदा ओस पडले आहेत. काल शहरात दिवसभर शुकशुकाट पसरला होता.
श्रीरामपुरात वाहनांनाही बंदी
प्रांताधिकारी पवार यांची माहिती
श्रीरामपूर (प्रतिनिधी)– श्रीरामपूर शहर व तालुक्यात करोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून प्रशासनाने अधिकच कठोर पावले उचलली आहेत. आता शहरातील रस्त्यांवर वाहनांना फिरण्यास बंदी घालण्यात आली असून भाजीपाले विक्रेत्यांनाही रस्त्यावर बसता येणार नसल्याचे प्रांताधिकारी अनिल पवार यांनी प्रसिद्ध केले आहे.
त्यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, श्रीरामपूर शहर व तालुक्यातील नागरिकांनी कोणत्याही कारणासाठी टू व्हिलर अथवा फोर व्हिलर घेऊन शहरात किंवा रस्त्यावर येऊ नये.
याची अंमलबजावणी केली नाही तर आपणास पोलीस कारवाईस सामोरे जावे लागेल. या संचारबंदीच्या काळामध्ये आपणास घरी तसेच घराबाहेर एकमेकांपासून अंतर ठेवून राहायचे आहे. जेणेकरून आपल्याला लागण होणार नाही, हे सर्व नागरिकांच्या हितासाठी असल्याने याची अंमलबजावणी सर्वांनी करायची आहे.
तसेच आजपासून भाजी विक्रेते कुठेही रस्त्यावर बसणार नाही. त्यांना लोटगाडी किंवा डोक्यावर घेऊन शहरात कॉलनी परिसरात फिरता येईल तसेच किराणा, औषधी घेण्यासाठी सुध्दा पायीच जावे लागणार आहे. त्यामुळे आपल्या घराशेजारील दुकानातच जावे, असे प्रसिद्ध करण्यात आले आहे. अन्यथा प्रशासन दंडात्मक कारवाई करेल असेही नमूद करण्यात आले आहे.