लोकशाहीच्या बळकटीसाठी सर्वांनी पुढे यावे : प्रांताधिकारी अनिल पवार यांचे आवाहन
श्रीरामपूर (प्रतिनिधी) – जगात भारतातील लोकशाहीचे वेगळे नाव आहे. नावाजलेल्या लोकशाहीच्या माध्यमातून प्रत्येक मतदार महत्त्वाची भूमिका पार पाडत असतो. तरीही लोकशाही आणखी बळकटीसाठी सर्व नागरिकांसह प्राधान्याने नवमतदार तरुणांनी जागरूक मतदार म्हणून पुढे येण्याचे आवाहन उपविभागीय अधिकारी अनिल पवार यांनी केले.
राज्य निवडणूक आयोगाच्या आयोगाच्या स्थापनादिनाचे औचित्य साधून सर्वत्र 25 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा केला जातो. यावेळच्या 10 व्या मतदार दिनानिमित्त जनजागृतीसाठी शहरातून काढलेल्या रावबहादूर नारायणराव बोरावके महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना व एनसीसी कल्याण मंडळ, चंद्ररूप डाकले जैन वाणिज्य महाविद्यालय, खा. गोविंदराव आदिक अँग्लो उर्दू कनिष्ठ महाविद्यालय, हजरत मौलाना मकदूम उर्दू हायस्कूल, भि. रा. खरोड कन्या विद्यालय, डी. डी. काचोळे विद्यालय, क. जे. सोमैय्या कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या प्रभातफेरीचा समारोप समारंभ पोलीस परेड ग्राउंडवर पार पडला. त्याप्रसंगी अध्यक्षपदावरून प्रांताधिकारी श्री. पवार बोलत होते.
व्यासपीठावर नायब तहसीलदार अशोक उगले, नायब तहसीलदार ज्योती गुंजाळ, प्रा. सादिक सय्यद, रोटरी क्लबचे अध्यक्ष राजेश कुंदे, प्रा. जलाल पटेल, दादा साठे, डॉ. बी. जी. घोडके, प्रा. व्ही. एम. मोरे, प्रा. व्ही. बी. नागपुरे, प्रा. एस. डी. पवार, शाहीन अहेमद रियाज अहेमद आदी उपस्थित होते.
तहसीलदार प्रशांत पाटील यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना लोकशाहीची रचना सांगून उद्याचे मतदार होणार्या विद्यार्थ्यांना सजग राहण्याचे तसेच भविष्यात नि:पक्ष मतदान करण्याचे आवाहन केले.
प्रास्ताविक करताना शकील बागवान यांनी निवडणूक आयोगाची रचना, निवड प्रक्रिया व आयोगाच्या कार्याचा इतिहास, मतदार नोंदणी प्रक्रियेतील क्रमबद्धता सांगितली तसेच विद्यार्थ्यांना नवमतदाराची शपथ दिली. याप्रसंगी विधानसभेमध्ये उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल श्रीधर बेलसरे, शकील बागवान, संजीवन दिवे, जितेंद्र भगत, पुरुषोत्तम चौधरी, संदीप पाळंदे, आसमा शेख यांचा महसूल मित्र म्हणून गौरव करण्यात आला.
तर मतदार नोंदणीचे कार्य सर्वोत्कृष्ठपणे पार पाडणारे केंद्रस्तरीय मतदार अधिकारी एकनाथ रहाटे, मुख्याध्यापक जलील शेख, ग्रामसेविका अलका साळवे, संभाजी फरगडे, रामदास जाधव, प्रशांत दर्शने यांचा बहुमान करण्यात आला. राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त तालुकास्तरावर घेण्यात आलेल्या चित्रकला व निबंध स्पर्धेतील विजेत्यांना प्रशस्तीपत्रांनी सन्मानित करण्यात आले. सूत्रसंचालन शकील बागवान यांनी केले. प्रा. जलाल पटेल यांनी आभार मानले.