नवी दिल्ली : न्यूझीलंडविरुद्ध भारताने विजयासह मालिकेची सुरुवात केली. न्यूझीलंडविरुद्ध ऑकलँडच्या इडन पार्कमधील पहिल्या टी-२० सामन्यात भारताने यजमान किवी संघाचा ६ विकेटने पराभव केला.
या सामन्यात न्यूझीलंडच्या संघाने भारतासमोर विजयासाठी 204 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत भारताने 4 विकेट्स गमावून लक्ष्य गाठले. टीम इंडियाकडून केएल राहुल याने ५६ आणि कर्णधार विराट कोहली याने ४५ धावा केल्या. या विजयासह भारताने ५ सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. इश सोधी २, मिशेल सॅटनर, ब्लेअर टिकनर यांनी प्रत्येकी १ गडी बाद केले. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या टी-20 सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना २० ओव्हरमध्ये पाच गडी गमावून २०३ धावा केल्या.
भारताकडून श्रेयस अय्यर आणि मनीष पांडे नाबाद परतले. श्रेयसने २९ चेंडूत ५८, तर मनीषने १४ धावा केल्या. मागील वर्षाच्या सुरुवातीस याच मैदानावर त्यांनी १५९ धावांचे लक्ष्य गाठले होते. टीम इंडियाने एकूण सहाव्यांदा २०० पेक्षा अधिक धावांचे लक्ष्य गाठले आहे. २०४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताकडून राहुल आणि श्रेयसने तुफानी अर्धशतक झळकावत संघाला विजय मिळवून दिला.