Saturday, May 4, 2024
Homeनगरचक्रीवादळाने झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा- ना. थोरात

चक्रीवादळाने झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा- ना. थोरात

संगमनेर (प्रतिनिधी)– निसर्ग चक्रीवादळामुळे राज्यासह तालुक्यातील अनेक भागात झालेल्या शेतीपिकांसह विविध नुकसानीची पाहणी राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन केली. झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा अशा प्रशासनाला सूचना दिल्या. नुकसानग्रस्तांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करू असेही ते म्हणाले.

आंबी खालसा, तांगडी, पाणसवाडी यांसह पठार भागातील विविध गावांतील नुकसानग्रस्त भागांची पाहणी नामदार थोरात यांनी केली. यावेळी समवेत अकोलेचे आ. डॉ. किरण लहामटे, सभापती सुनंदाताई जोर्वेकर, जिल्हा परिषद सदस्य अजय फटांगरे, आर. एम. कातोरे, उपसभापती नवनाथ अरगडे, प्रियंकाताई गडगे, उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, उपसरपंच सुरेश कान्होरे, गोकुळ कहाणे, बाळासाहेब ढोले, सुरेश गाडेकर, अ‍ॅड. सुहास आहेर, सुहास वाळुंज यांसह महसूल प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते.

- Advertisement -

नामदार थोरात म्हणाले, राज्यात करोना पाठोपाठ निसर्ग चक्रीवादळाचे मोठे संकट आले होते. सरकार व प्रशासनाने वादळाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्वत्र चांगली आपत्कालिन व्यवस्था केली होती. कोकण किनारपट्टीवर या निसर्ग चक्रीवादळाने मोठे नुकसान केले आहे. त्याचबरोबर संगमनेर तालुक्यासह शेजारील तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात उभ्या पिकांचे व इतर नुकसान झाले आहे. शेतकर्‍यांच्या हाताशी आलेला घास वादळाने हिसकावून घेतला आहे.

महाविकास आघाडी सरकार हे कायम शेतकर्‍यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहे. या वादळामुळे नुकसान झालेल्या सर्व पिकांचे व इतर नुकसानीचे तातडीने पंचनामे करा अशा सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. याचबरोबर या वादळाने तालुक्यात अनेक ठिकाणचा वीज पुरवठा खंडित झाला असून तोही तातडीने सुरळीत करण्यासाठी काम करावे. या वादळामुळे नुकसानग्रस्तांना जास्तीत जास्त मदत देण्यासाठी शासन प्रयत्नशील राहील असे सांगून राज्यातील विविध भागात निसर्ग चक्री वादळाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश महसूल विभागास दिले आहेत.

यावेळी अनेक शेतकर्‍यांनी नामदार थोरात यांच्याकडे आपल्या व्यथा मांडल्या. या सर्वांच्या समस्या एकूण तातडीने पंचनामे व मदत करण्याच्या सूचना महसूलमंत्र्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या