नळाच्या मीटरसाठी 3100 रुपयांचा भुर्दंड नगरकरांच्या माथी
अहमदनगर (प्रतिनिधी)- पिण्याच्या पाण्याची नासाडी आणि फुकट्यांना चाप लावणारा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. नगरकरांना यापुढे पाणी मोजून-मापून मिळणार असले तरी त्यासाठी नळधारक नगरकरांच्या माथी 3100 रुपयांचा भूर्दंड पडणार आहे. फेज 2 पाणी योजनेवरून नळजोडणी अन् मीटर बसविण्याचा ठेका उद्या होणार्या स्थायी समितीच्या सभेत निश्चित केला जाईल.
शहराला मुळा धरणातून पाणी पुरवठा होतो. नगरकरांना एक दिवसाआड पिण्याचे पाणी महापालिका पुरविते. तासभरापेक्षा जास्त वेळ पाणी पुरवठा सुरू असल्याने अनेक नगरकर पाण्याचा वापर वाहने धुण्यासाठी करतात. त्यामुळे पाण्याचा अपव्य होतो. पाण्याची नासाडी टाळण्यासाठी महापालिकेने नळांना मीटर बसविण्याचा निर्णय जानेवारी 2019 मध्येच घेतला. पण त्याची अंमलबजावणी आता वर्षभरानंतर होणार आहे.
वर्षभरापासून मीटरने पाणी देण्याचा विषय चर्चेत होता. त्यासाठी टेंडरही महापालिकेने मागविले. महापालिकेने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे पत्र पाठवून दर किती असावे याचे मार्गदर्शन मागविले. नाशिक विभागाडे असे मीटरचे दरच उपलब्ध नसल्याने अमरावीत व नागपूर विभागाचे दरपत्रक जीवन प्राधिकरणाने महापालिकेला दिले.
या दरानुसार महापालिकेच्या छाननी समितीने ठेकेदाराशी चर्चा केली. त्यानंतर ठेकेदाराने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे दर मान्य असल्याचे कळविल्यानंतर टेंडर मंजुरीसाठी स्थायी समितीकडे पाठविले आहे. स्थायी समितीने मान्यता दिल्यानंतर शहरात नवीन नळजोडणी देत मीटर बसविले जाणार आहे. मीटरने पाणी पुरवठा होणार असल्याने यापुढे पाण्याची नासाडी थांबेल असा दावा महापालिका प्रशासन करत आहे.
शहराचा नव्हे तर टाकीनिहाय ठेका
महापालिकेने नवीन नळजोड आणि त्याला मीटर बसविण्याचा ठेका देताना संपूर्ण शहरासाठी न देता तो पाणी साठवण टाकीनिहाय देण्यात आला आहे. आगरकर मळा, वसंत टेकडी, बागडे मळा, सरोष टाकी, लालटाकी, आरटीओ, मुकुंदनगर पाणी साठवण टाकी निहाय ठेकेदार नियुक्त करण्यात आले आहे. त्यामुळे टाकीनिहाय वेगवेगळे दर निश्चित होणार आहे.
फुकट्यांना बसेल चाप
महापालिकेचे पाणी वापरत असले तरी अनेक मालमत्ताधारकांची नोंद महापालिकेकडे नाही. त्यामुळे हजारो बोगस नळ कनेक्शनमधून महापालिकेचे पाणी फुकटात वापरणार्यांना यामुळे चाप बसणार आहे. अर्थात त्यासाठी ठेकेदाराला प्रामाणिकपणे काम करावे लागणार आहे. नगरसेवकाचा हस्तक्षेप टळला तरच फुकट्यांना चाप बसेल अन्यथा फुकटे मागील पानावरून पुढे… होतील, अशी शंका उपस्थित केली जात आहे.
महापालिका कंट्रोलर
फेज 2 पाणी योजनेवर नवीन नळ कनेक्शन देताना मीटरसह दिले जाणार आहे. महापालिकेने नळ जोड देण्याचा ठेका दिला असला तरी त्याचे पैसे मात्र नळधारकालाच भरावे लागणार आहे. अर्ध्या इंच कनेक्शनसाठी 3 हजार 108 रुपये नळधारकाला द्यावे लागणार आहे.
डीआय पाईप
अर्धा इंच 3108
पाऊण इंच 3860
एक इंच 4560
एचडीपीई पाईप
अर्धा इंच 4436
पाऊण इंच 5190
एक इंच 5992