श्रीरामपुरातील घटना; नवरा, सासू-सासर्याविरुद्ध गुन्हा
श्रीरामपूर (प्रतिनिधी) – तुझ्या आईवडिलांनी लग्न चांगले लावून दिले नाही, लग्नात हुंडा दिला नाही त्यामुळे माहेरहून 50 हजार रुपये आणावेत, या कारणासाठी विवाहितेचा छळ करण्यात आला. त्यामुळे या छळास कंटाळून श्रीरामपुरातील विवाहितेने राहत्या घरात ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली. अनुराधा सचिन उमाप (वय 18) असे या महिलेचे नाव आहे.
याबाबत श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात सौ. बायजाबाई अनिल शिंदे (वय 42, धंदा मजुरी, रा. रेणुकानगर गारखेडा परिसर, औरंगाबाद) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन आरोपी नवरा सचिन भगवान उमाप, सासरा भगवान भीमराव उमाप, सासू माया भगवान उमाप (सर्व रा. सिद्धार्थनगर, वार्ड नं. 1, श्रीरामपूर) यांच्याविरुध्द गु.र.नं.। 921/2019 भादवि कलम 498(अ), 306, 323, 504, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गेल्या 11 जुलै 2019 रोजी लग्न झाल्यानंतर एक महिन्यापासून ते 28 डिसेंबर 2019 या कालावधीत वेळोवेळी सौ.अनुराधा सचिन उमाप ही तिच्या सासरी नांदत असताना नवरा सचिन उमाप, सासरा भगवान उमाप, सासू माया उमाप यांनी संगनमत करून तिला मानसिक व शारीरिक त्रास दिला.
तुझ्या आईवडिलांनी लग्न चांगले लावून दिले नाही व लग्नात हुंडा दिला नाही. त्यामुळे तू माहेराहून हुंडा म्हणून 50 हजार रुपये आणावेत, या कारणावरून तिला नेहमी मानसिक व शारीरिक त्रास दिला. या त्रासास कंटाळून अनुराधा हिने राहत्या घरात ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
याबाबत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे श्रीरामपूर शहरात खळबळ उडाली आहे. याबाबत पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक संभाजी पाटील हे करीत आहेत.