अहमदनगर (प्रतिनिधी) – जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निवडीआधी जिल्ह्याच्या राजकारणाला जबरदस्त बुडबुडे आले आहेत. कोणाचे बुडबुडे फुटणार आणि कोणाचे सत्तेपर्यंत जाणार, याची उत्सुकता वाढली आहे. पुढील दोन दिवस पडद्याआड मोठ्या उलथापालथींचे संकेत शनिवार दिवसभरातील घडामोडींनी दिले. एकीककडे अंतर्गत वादाने बेजार असलेल्या भाजपने अध्यक्षपदासाठी शतप्रतिशत ताकदीनिशी शड्डू ठोकण्याचा संकल्प केला तर दुसरीकडे आघाडीने ऐनवेळी दगाफटका होऊ नये यासाठी आपल्या सदस्यांना लवासा सिटीत ‘इअरएण्ड ट्रीप’ घडविली आहे. सेनाही आपल्या पदरात अधिकचे कोणत्या मार्गाने पडेल, याची चाचपणी करताना दिसली. जिल्हा परिषदेत सत्ता हाती आल्यावर ‘मलाईदार’ विभाग आपल्या हाती लागावा यासाठी पक्ष, त्यातील नेते आणि समर्थक कामाला लागल्याचे समोर आले.
काँग्रेस-सेना-गडाख गटात ‘अर्थ व बांधकाम’साठी रस्सीखेच
शिवसेना पदाधिकारी, सदस्यांनी घेतली खासदार अनिल देसाई यांची भेट
अहमदनगर (प्रतिनिधी) – जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षपद ताब्यात घेण्यासाठी महाविकास आघाडीने कंबर कसली आहे. सर्वाधिक सदस्य असणार्या राष्ट्रवादीच्या वाट्याला अध्यक्षपद जाणार असले तरी त्यानंतर महत्त्वाचे असणारे उपाध्यक्ष आणि अर्थ व बांधकाम समिती सभापतिपद मिळविण्यासाठी काँग्रेस-सेना आणि गडाख गटात रस्सीखेच असल्याचे दिसत आहे. शिवसनेच्या पदाधिकारी आणि सदस्यांनी शनिवारी मुंबई गाठत खासदार अनिल देसाई यांच्याकडे अर्थ व बांधकाम समितीसाठी आग्रह धरल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दरम्यान, खा. देसाई यांनी जिल्हा परिषद सदस्यांचा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याशी संवाद घडवून आणाला असून ठाकरे यांनी सेनेच्या सदस्यांना महाविकासआघाडीसोबत राहण्याचे आदेश दिले आहेत. येत्या 31 तारखेला जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडी होत आहेत. जिल्हा परिषदेत सत्ता मिळविण्यासाठी राज्यात अस्तित्वात आलेली राष्ट्रवादी- काँग्रेस आणि शिवसेनेची महाविकास आघाडी जिल्हा परिषदेत देखील उदयास आली आहे. या आघाडीतील सर्व घटक पक्ष आपापल्यापरीने दक्षता घेतांना दिसत आहेत. जि.प.मध्ये अध्यक्षपदाचा विषय संपला असून आता उपाध्यक्षपदासोबत चार विषय समित्या कोणाच्या वाट्याला येणार यावर खल सुरू आहे. वजनदार समिती आपल्या ताब्यात यावी, यासाठी प्रयत्न होतांना दिसत आहे.
दुसरीकडे अनेक वर्षानंतर शिवसेना आता थेट सत्तेत सहभागी होणार असल्याने सेनेच्या वाट्याला महत्वाची समिती मिळावी, अशी मागणी शिवसेनेच्या सदस्यांची आहे. यासाठी सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रा. शशिकांत गाडे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेतील गटनेते अनिल कराळे, सदस्य संदेश कार्ले, शरद झोडगे, काशिनाथ दाते, सुषमा दराडे, गोेविंद मोकाटे, मनपाचे नगरसेवक अनिल शिंदे, योगीराज गाडे यांनी खा. देसाई यांची भेट घेतली. यावेळी जिल्हा संपर्कप्रमुख भाऊ कोरेगावकर हे देखील उपस्थित होते.
जिल्हा परिषदेत शिवसेनेच्या वाट्याला वजनदार समिती आल्यास त्याचा फायदा पक्षाला होणार असल्याचे यावेळी खा. देसाई यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. त्यावर याबाबत सेनेचे श्रेष्ठी हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या श्रेष्ठींशी चर्चा करून अंतिम निर्माण घेणार असल्याचे सांगण्यात आले. तसेच मुख्यमंत्री ठाकरे यांनी शिवसेनेच्या सदस्यांनी महाविकास आघाडीसोबत राहण्याचे आदेश सेनेच्या पदाधिकारी आणि सदस्यांना दिले.
काँग्रेसच्या गोटात देखील उपाध्यक्षपदापेक्षा अर्थ-बांधकाम समितीसाठी आग्रह आहे. अध्यक्षपदानानंतर अर्थ-बांधकाम समितीला महत्व असल्याने ही समिती आपल्याला मिळावी, यासाठी गडाख गटाचा प्रयत्न आहे. यामुळे जिल्हा परिषदेत आता अर्थ-बांधकामवरून महाआघाडीत खडखडाट होण्याची चिन्हे आहेत.
जिल्हा परिषदेत महिला व बालकल्याण आणि समाजकल्याण समितीच्या सभापती पदासाठी आरक्षण आहे. यामुळे या दोन समित्यांसाठी राजकीय पक्षांचा फारसा आग्रह नसतो. पहिल्या अडीच वर्षात उपाध्यक्षपदासह, अर्थ व बांधकाम आणि समाजकल्याण समिती ही राष्ट्रवादीच्या वाट्याला होती. तर अध्यक्षपदासह कृषी आणि महिला बालकल्याण समिती काँग्रेसच्या वाट्याला आली होती. यंदा ही सत्तेची विभागणी कशी होणार याकडे जिल्ह्याचे लक्ष आहे.
अध्यक्षपदासाठी भाजप पूर्ण ताकदीने लढणार
पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत निर्णय : ऐनवेळी उघडणार पत्ते
अहमदनगर (प्रतिनिधी) – जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची निवडणूक पूर्ण ताकदीनिशी लढविण्याचा निर्णय भाजपने घेतला असून, यासाठी पक्षाचे सर्व नेते एकत्र आहेत. अध्यक्षपदाचा उमेदवार कोण हे अर्ज दाखल करताना 31 डिसेंबरला कळेल, असे पक्षाचे नेते आमदार राधाकृष्ण विखे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
विधानसभा निवडणुकीनंतर माजी मंत्री राम शिंदे, माजी आ. शिवाजी कर्डिले यांनी आपल्या पराभवास विखे जबाबदार असल्याचे जाहीरपणे सांगितले होते. या सर्व पार्श्वभूमीवर शुक्रवारी मुंबईत राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थतीत बैठक झाली. त्यानंतर याच बैठकीत जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी 31 डिसेंबरला होणार्या निवडणुकीसंदर्भात निर्णय घेण्यासाठी सर्वाधिकार आ. विखे पाटील आणि माजी मंत्री राम शिंदे यांना देण्यात आले. त्या पार्श्वभूमीवर येथील विश्रामगृहावर पक्षाच्या जिल्ह्यातील कोअर कमिटीची बैठक शनिवारी झाली. बैठकीस विखे, शिंदे, कर्डिले यांच्यासोबत आ. मोनिका राजळे, जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड, नितीन कापसे उपस्थितत होते. बैठकीनंतर आ. विखे यांनी बैठकीतील चर्चेची माहिती पत्रकारांना दिली.
आ. विखे पाटील म्हणाले, 31 डिसेंबरला होणारी जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवडणूक लढविण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या नाराजीचा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीवर कसलाही परिणाम नाही. आम्ही सर्व एक आहोत आणि एकत्रित या निवडणकीला सामोरे जाणार आहोत. जिल्हा परिषदेत कोणाचे किती संख्याबळ आहे, हे सांगण्याचा सर्वच प्रयत्न करत आहेत. मात्र आमची व्युहरचना काय असेल, ते वेळेवरच लक्षात येईल.
भाजपमध्ये खुमखुमी असेल, तर त्यांनी निवडणूक लढवून दाखवावी, असे आव्हान राष्ट्रवादीचे पक्षनिरीक्षक अंकुश काकडे यांनी काल दिले होते. त्यावर बोलताना आ. विखे पाटील म्हणाले, काकडे यांनी नगर जिल्हा पाहण्यापेक्षा पुण्यात महापालिकेमध्ये राष्ट्रवादीची काय वाताहात झाली ते पहावे आणि तेथे सुधारणा करावी. काकडे काय म्हणतात याची आम्ही कोणी दखल घेत नाहीत.
मावळत्या जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनी विखे पाटील यांना भाजप पाठिंबा देणार का, या प्रश्नावर वेळ आल्यावर सर्व निर्णय घेतले जातील, असे ते म्हणाले. महाविकास आघाडीने नगरमध्ये तुमची कोंडी केली का, असे या प्रश्नावर ते म्हणाले, महाविकास आघाडी संपूर्ण राज्यात आहे. ती फक्त नगरपुरती नसल्याने येथेच कोंडी होण्याचे कारण नाही. राजकारणात काहीही होऊ शकते.
कोणतीही विचारधारा नसलेले सरकार सत्तेवर आलेले असल्याने यावरूनच राजकारणात काहीही होऊ शकते, हे लक्षात येते. खा. डॉ. सुजय विखे पाटील जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीसंदर्भात काही सदस्यांशी बोलले असल्याचे समजते, याबाबत विचारले असता ते कोणाशी बोलले माहिती नाही, मात्र माझे सर्वांशीच बोलणे सुरू असते, असे सूचक वक्तव्य विखे यांनी केले.
राज्यातील नुकसान कोणामुळे ?
राज्यात भाजप सर्वाधिक मोठा पक्ष ठरला आहे. राज्यात सत्तेवर आलेले सरकार अपघाताने आलेले आहे. राज्यात अनेक ठिकाणी कमी अधिकप्रमाणात नुकसान झालेले आहे, त्या सर्व नुकसानीस विखे कारणीभूत आहेत का, असा प्रतिप्रश्न आ. विखे पाटील यांनी केला. राष्ट्रवादीने शंभर जागा येतील, असे सांगितले. काँग्रेस स्वबळावर सरकार येईल, असे सांगत होती. त्याबाबत कोणी बोलत नाही, मात्र मी 12-0 म्हटल्याने त्यावर चर्चा होत आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत कधी निवडून न आलेले राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष यावर बोलू लागले आहेत, असा टोलाही आ. विखे पाटील यांनी लगावला.
भाजपच्या सदस्यांना बजावला व्हिप
माजी मंत्री राम शिंदे यांच्या नगरमधील संपर्क कार्यालयात शनिवारी जिल्हा परिषदेतील पक्षाचे 12 सदस्य आणि शिंदे यांची बैठक झाली. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडीच्या पार्श्वभूमीवर गट नेते जालींदर वाकचौरे यांनी पक्षाच्या 12 सदस्यांना व्हिप बजावला. पक्षाकडून या निवडणुकीत उमेदवार उभा करण्यात येणार असून त्या उमेदवाराला मतदान करण्याचे आदेश वाकचौरे यांनी सदस्यांना दिले आहे.
विखेंनी सेनेला अध्यक्षपदाची ऑफर दिल्यास ?
जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीच्या लढाईत उतरण्याचा निर्णय भाजप आणि आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतला. या राजकीय लढाईत राष्ट्रवादीला अध्यक्षपदापासून रोखण्यासाठी विखे पर्यायाने भाजपने शिवसेनेला अध्यक्षपदाची ऑफर दिल्यास समीकरणे बदलू शकतात का, यावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. यापूर्वी नगर जिल्ह्याने विखे पॅटर्न अनुभवलेला आहे. यामुळे 31 तारेखला अध्यक्ष, उपाध्यक्षाच्या निवडी पूर्ण होइपर्यंत काहीही अशक्य नसल्याची चर्चा सुरू आहे. मात्र अध्यक्षपदाची ऑफर आलीच तर सेनेचे स्थानिक नेते वरिष्ठांना कसे पटविणार, याचीही उत्सुकता असेल.
विखेंवर कर्डिले नाराजच !
विधानसभा निवडणुकीनंतर आ. विखे पाटील यांच्यावर झालेले आरोप या संदर्भात माजी मंत्री राम शिंदे व माजी आ. शिवाजी कर्डिले यांना सातत्याने विचारणा करण्यात आली. मात्र या विषयावर त्यांनी पत्रकार परिषदेत बोलण्यास नकार दिला. पत्रकार परिषद झाल्यानंतर मात्र कर्डिले म्हणाले, आम्ही पक्षाकडे तक्रारी केल्या आहेत. त्याचा अहवाल जोपर्यंत येत नाही आणि पक्ष त्यावर भूमिक घेत नाही, तोपर्यंत आमची नाराजी कायम असेल. पत्रकार परिषदेत आ. विखे म्हणाले, या विषयावर पक्षश्रेष्ठींसमोर सविस्तर आणि मोकळ्या मनाने चर्चा झाली. माझ्यामुळे नुकसान झाले का, पक्षाची ताकद वाढली की नाही आदीबाबत आणि माझ्यावरील आरोपांबाबत श्रेष्ठींकडून माहिती घेतली जाईल. त्यानंतर काय तो निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील.
आघाडीच्या सदस्यांचा ‘लवासा’त एन्जॉय
खबरदारी म्हणून सदस्यांना हलविले
अहमदनगर (प्रतिनिधी) – जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडी 31 डिसेंबरला होणार आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आपल्या सदस्यांना लवासाला हलविले आहे. रविवार आणि सोमवारी हे सदस्य लवासामध्ये एन्जॉय करणार असून जिल्हा परिषद पदाधिकारी निवडीच्या दिवशी मंगळवारी हे सदस्य नगरमध्ये दाखल होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडीत कोणताही धोका न स्वीकारण्याचा निर्णय काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी घेतला आहे. यामुळे दोन्ही पक्षाच्या 22 ते 25 सदस्यांना एकत्र करून शनिवारी नगरहून आधी पुण्याला नेणण्यात आले. त्या ठिकाणी आणखी काही सदस्यांना एकत्र करून शनिवारी रात्री लवासा सीटी या ठिकाणी नेण्यात आले. आधी काँग्रेसच्या सदस्यांना लोणावळा या ठिकाणी ठेवण्यात येणार होते. मात्र, त्यानंतर हा निर्णय बदलण्यात आला आणि दोन्ही पक्षाच्या सदस्यांना लवासा सीटी या ठिकाणी नेण्यात आले.
आता दोन दिवस हे सदस्य लवासा सीटीचा आनंद घेवून मंगळवारी अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी दुपारी जिल्हा परिषदेच्या सभागृहात हजर होणार असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले. दरम्यान, घरगुती कारणामुळे काही सदस्य या सहलीला मुकले असून ते रविवारी रात्री अथवा सोमवारी सकाळी सहलीत सामील होणार असल्याचे सांगण्यात आले.
जिल्हा परिषदेच्या अलीकडच्या काही वर्षांत पहिल्यांदा सदस्यांना पदाधिकारी निवडीच्या पार्श्वभूमीवर सहलीवर पाठविण्याचा योग आला आहे. भाजप आणि विखे यांच्याकडून ऐनवेळी आपल्या पक्षाच्या सदस्यांना गळ घातला जाऊ नये, यासाठी हा उपाय करण्यात आल्याचे सांगण्यात आले.