Saturday, May 4, 2024
Homeनगरश्रीगोंदा : ज्येष्ठ नेते भोस यांच्याविरूद्ध गुन्हा

श्रीगोंदा : ज्येष्ठ नेते भोस यांच्याविरूद्ध गुन्हा

श्रीगोंदा पोलिसांना जाब विचारताना केली दमदाटी

श्रीगोंदा (प्रतिनिधी)- जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष व राष्ट्रवादीचे ज्येष्ठनेते बाबासाहेब भोस यांच्या विरोधात पोलिसांना जाब विचारत दमदाटी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.  श्रीगोंदा पोलीस स्टेशनच पो. कॉ. संदीप पितळे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी हॉटेल सृष्टी व हॉटेल सिद्धीजवळ जुगार खेळताना पोलिसांनी कारवाई केली होती. याबाबत फोनवर पो. कॉ. पितळे यांना जाब विचारत अरेरावी केली. पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करत दमदाटी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

- Advertisement -

20 मे रोजी हॉटेल सृष्टीजवळ पत्ते खेळताना नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व पंचायत समितीचे सदस्य अण्णासाहेब शेलार यांनी पोलीस कॉन्स्टेबल संदीप पितळे यांना फोन केला.

‘आमच्या जावयाच्या हॉटेलचे नाव बातमीत कसे आले. ते काय घरात पत्ते खेळत होते का,’ असे म्हणत फोन बाबासाहेब भोस यांच्याकडे दिला. भोस यांनी ‘तुम्ही गुन्हा तीन पानी दाखल केला आहे. ते रम्मी खेळत होते.तुमच्या आईबापाची शपथ घेऊन सांगा काय खेळत होते? महंमद बाबाच्या पंढरीत खरे बोला. असे वागत असाल तर ही पद्धत बरोबर नाही. पोलीस निरीक्षक आणि तहसीलदार यांचे काम आम्ही पहात आहोत. एक दिवस तुमची नोकरी जाईल. सगळ्यांची चौकशी करणार. यानंतर मी फोन करणार नाही, असे म्हणत पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करत दमदाटी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

भोस यांचा प्रतिक्रियेस नकार
याबाबत ज्येष्ठ नेते बाबासाहेब भोस यांची भेट घेतली असता त्यांनी या प्रकाराबाबत प्रतिक्रिया देण्याचे टाळले. आपल्याला सकाळी याबाबत माहिती मिळाली असल्याचे त्यांनी सांगितले.

वादाला जुगारावरील कारवाईची किनार
अण्णासाहेब शेलार यांच्या फोनवरून बोलताना भोस यांची जीभ घसरली. मात्र त्यांनी पोलिसांचे काही कारनामे माझ्या कानावर आले असून आपण दुर्लक्ष करत होतो, असे सांगितले. याच जुगाराच्या कारवाईत मुद्देमालबाबत तक्रार असून तेथे जप्त केलेले पैसे सर्व कागदावर दाखवण्यात आले नसल्याची तक्रार आहे. तीन दिवसांपासून या कारवाईची चर्चा सुरू असून या प्रकरणाला देखील याच कारवाईच्या वादाची किनार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या