Wednesday, May 21, 2025
Homeनाशिकमुख्यमंत्र्यांच्या हस्ते 'महाविस्तार-एआय अ‍ॅप'चे लोकार्पण

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘महाविस्तार-एआय अ‍ॅप’चे लोकार्पण

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

- Advertisement -

कृषी विभागाने विकसित केलेल्या ‘महाविस्तार एआय अ‍ॅप’; चे लोकार्पण आज करण्यात आले. याबाबतची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. महाविस्तार अ‍ॅपवर शेतीबाबत सगळी माहिती उपलब्ध असणार आहे. हा अ‍ॅप एआय आधारित असून शेतीचे सर्व व्हिडिओ त्यात उपलब्ध असतील. लागवडीपासून ते कीड व्यवस्थापनापर्यंतची सर्व माहिती या पमध्ये आहे. मराठीत चॅटबॉट देखील त्यात आहे. शेतकऱ्याने कोणताही प्रश्न विचारला तर त्यात त्याचे उत्तर मिळेल. हा अ‍ॅप शेतकऱ्याचा डिजिटल मित्र असून तो गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. लवकरच हा चॅटबॉट व्हॉटसअ‍ॅपवर देखील आणू. कोणत्या बाजारपेठेत शेतमालाचे भाव काय आहेत याची रिअलटाईम माहिती शेतकऱ्याला अ‍ॅपमधून मिळू शकते, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार या वर्षी राज्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस असणार आहे. राज्याच्या विविध विभागात ७ ते १७ टक्के जास्त पाऊस पडेल. दोन वेळच्या पावसात जास्त खंड सुद्धा नसेल. त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामात विक्रमी उत्पादन होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी येथे व्यक्त केला. या वर्षीच्या खरीप हंगामात २०४ लाख मेट्रिक टन उत्पादनाचे लक्ष्य ठेवण्यात आल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात राज्यस्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक पार पडली. या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना फडणवीस यांनी यावर्षी राज्यात बी-बियाण्यांचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती दिली. बोगस बियाण्यांना आळा घालण्यासाठी यावर्षीपासून सत्यप्रत बियाणे केंद्र सरकारच्या साथी पोर्टलवर नोंदवावे लागणार आहे. त्यामुळे बोगस बियाण्यांचा प्रश्नही सुटणार आहे. कर्ज देताना शेतकऱ्यांना सिबिलची सक्ती करणाऱ्या बँकांवर देखील कारवाई करण्यात येणार असल्याचा पुनरुच्चार फडणवीस यांनी यावेळी केला.

राज्यात पुरेशा प्रमाणात खते उपलब्ध असून खतांचा तुटवडा पडणार नाही. मागील वर्षाचा कल पाहता कोणते पीक कमी अधिक प्रमाणात घेता येईल याचा विचार करूनच बियाण्यांची उपलब्धता करण्यात आली आहे. बोगस बियाणे रोखण्यासाठी केंद्राच्या साथी पोर्टलवर नोंदणी करावी लागणार आहे. यामुळे बियाण्यांचे नेमके उत्पादन कुठे झाले हे शोधता येते. या सत्यप्रत बियाण्यांना देखील आता केंद्राच्या साथी पोर्टलवर नोंदवावे लागणार आहे. केंद्राने आपले पाहून इतर राज्यांना हा नियम करायला सांगितला आहे. सध्या ७० हजार क्विंटल बियाणे पोर्टलवर उपलब्ध आहे. पुढील वर्षपासून १०० टक्के सत्यप्रत बियाणे साथी पोर्टलवर येईल. त्यामुळे बोगस बियाणे बंदच होईल, असे फडणवीस यांनी सांगितले.

प्रत्येक कृषी केंद्राच्या बाहेर खत लिंकिंगच्या संदर्भात फलक लागणार आहे. या फलकावर लिंकिंग संदर्भात शेतकऱ्यांना तक्रार करण्यासाठी नंबर असेल. पुरवठादार कंपन्यांनी लिकिंगची सक्ती केली तर त्यांच्यावर जीवनावश्यक वस्तू कायद्याच्या अंतर्गत कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

 

प्रत्येक तालुक्यात डिजिटल शेतीशाळा
यावर्षीचा खरीप हंगाम चांगला असणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यासाठी कीड व्यवस्थापन महत्वाचे आहे. कापसावर अळी, सोयाबीन, धानावर मावा तुडतुडा असे अनेक रोग पहायला मिळतात. त्यामुळे कीड व्यवस्थापनासाठी चांगली काळजी घेण्यात येणार असून शेतक-यांसाठी डिजिटल शेतीशाळा प्रत्येक तालुक्यात आयोजित करण्यात येतील. या माध्यमातून शेतकऱ्याला कीड व्यवस्थापनापासून ते सर्व प्रकारचे नवीन पद्धतीचे मार्गदर्शन देण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

शेतकऱ्यांना ८३९ कोटी अनुदान
दरम्यान, आजच्या राज्यस्तरीय खरीप हंगाम नियोजन बैठकीत महाडीबीटी शेतकरी योजनेंतर्गत पात्र शेतकर्‍यांच्या नावांची यादी जाहीर करण्यात आली. शेतकऱ्यांना अनुदान, मदत आणि इतर फायद्यांचे वितरण सुलभ करणे हे या योजनेचे उद्दिष्ट असून यासाठी कृषी विभागाने अर्ज निवड प्रक्रियेची ‘प्रथम येणार्‍यास प्रथम प्राधान्य’ ही नवी पद्धत लागू केली आहे. या अंतर्गत वर्ष २०२५-२६ साठी साठी प्रथमतः १ लाख ५१ हजार ३५२ शेतकर्‍यांची निवड झालेली असून त्यांना अंदाजे ८३९ कोटी ५५ लाख रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Ahilyanagar : निळवंडेच्या पाण्याने भरलेल्या तलावात बहीण-भावाचा बुडून मृत्यू

0
कोर्‍हाळे |वार्ताहर| Korhale राहाता (Rahata) तालुक्यातील कोर्‍हाळे (Korhale) येथील भांबारे मळ्यातील साठवण तलाव निळवंडेच्या पाण्याने (Nilwande Water)  नुकताच भरला. या तलावात (Pond) बुधवारी दुपारी 2...