दिल्ली । Delhi
देशाचे माजी सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्यावर बूट फेकण्याच्या धक्कादायक घटनेनंतर आता त्या संबंधित वकिलावरही हल्ला झाल्याची बातमी समोर आली आहे. राकेश किशोर नावाच्या ज्या वकिलाने काही महिन्यांपूर्वी न्यायमूर्ती गवई यांच्यावर बूट भिरकावला होता, त्याला दिल्लीतील एका कोर्ट परिसरात काही वकिलांनीच मारहाण केल्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
माजी सरन्यायाधीश भूषण गवई हे सरन्यायाधीशपदावर कार्यरत असताना ऑक्टोबर महिन्यात त्यांच्या कोर्टरूममध्ये राकेश किशोर या वकिलाने बूट फेकला होता. थेट न्यायव्यवस्थेच्या सर्वोच्च पदावर असलेल्या व्यक्तीवर झालेल्या या कृत्याचे पडसाद देशभर उमटले होते. या कृतीवर सामाजिक आणि विद्वान वर्गातून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला होता, कारण हा प्रकार भारतीय न्यायसंस्थेचा अवमान करणारा मानला गेला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना दिल्लीतील करकडडूमा कोर्ट परिसरात घडली. बूट फेकणारा वकील राकेश किशोर कोर्ट परिसरात आला असताना काही वकिलांनी त्याला घेरले आणि मारहाण केली. वकिलांनी त्याला थेट चपलेने मारले, असे सांगण्यात येत आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये राकेश किशोर हा वकिली गणवेशात (काळा कोट आणि पांढरी पँट) दिसत आहे. काही लोक त्याला चपलेने मारहाण करताना दिसतात. मारहाण होत असताना राकेश किशोर हा “तुम्ही मला का मारत आहात?” असे विचारत आहे. त्यानंतर काही वेळाने तो “सनातन धर्म की जय” अशा घोषणा देतानाही दिसतो. या घटनेनंतर न्यायालय परिसरात तणाव निर्माण झाला होता. परिसरातील सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तातडीने हस्तक्षेप करून राकेश किशोर याला जमावापासून बाजूला काढले आणि बाहेर सुरक्षितपणे पाठवले. यामुळे पुढील अनर्थ टळला.
दरम्यान, राकेश किशोर याला झालेल्या मारहाणीवर समाज माध्यमांवर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काही लोक हिंसेला हिंसेने उत्तर देणे योग्य नाही, असे मत व्यक्त करत आहेत. तर दुसरीकडे, ज्याने माजी सरन्यायाधीशांचा अवमान केला, त्याला मिळालेली ही वागणूक योग्यच आहे, असे म्हणणारेही अनेकजण आहेत. एकंदरीत, माजी सरन्यायाधीशांवर बूट फेकल्याच्या घटनेनंतर आता वकिलाला कोर्ट परिसरात झालेल्या मारहाणीमुळे हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. न्यायव्यवस्थेशी संबंधित या दोन्ही घटनांमुळे समाजात मोठी चर्चा सुरू आहे. या प्रकरणावर न्यायालयीन स्तरावर आणि प्रशासकीय पातळीवर पुढे काय कारवाई होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.




