पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi
ओबीसी समाजाने एकवटले पाहिजे अन्यथा गावगाड्यातील सामान्य ओबीसी बांधवांवर हल्ले वाढतच जातील असा इशारा देत आज ओबीसींचे अस्तित्व धोक्यात आले असून गोपीनाथ मुंडे असते तर ओबीसींवर ही वेळ कधीच आली नसती अशा शब्दांत प्रा. लक्ष्मण हाके यांनी जोरदार टीका केली.
पाथर्डी तालुक्यातील दैत्यनांदूर येथे ओबीसीचा महाएल्गार मेळावा आयोजित करण्यात आला होते.त्यावेळी हाके बोलत होते.गावातून जंगी स्वागत करून भगवानगड परिसरातील गावातून आलेल्या ओबीसी नेत्यांसह नागरिकांनी या मेळाव्यात सहभाग घेतला. स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सभा स्थळापर्यंत वाजतगाजत हाके यांची मिरवणूक काढण्यात आली. भर पावसात ही सभा पार पडली असून यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
या मेळाव्यास नवनाथ वाघमारे, बाळासाहेब सानप, किसन आव्हाड, राजेंद्र दौंड, गोकुळ दौंड, अरुण मुंडे, सुरेश आव्हाड, अजिनाथ दहिफळे, बळीराम खटके, बाळासाहेब वाघ, संगीता ढवळे, मुकुंद आंधळे यांसह विविध ओबीसी नेते उपस्थित होते.
प्रा. हाके म्हणाले, सत्ताधारी आपल्या बाजूने बोलायला तयार नाहीत. एकही आमदार आमच्या पाठिशी उभा नाही. आता ओबीसींनी स्वतःच एकत्र यावे लागेल. गावगाड्यातील ओबीसींवर हल्ले होत असताना आपण शांत राहिलो तर भविष्यात परिस्थिती बिकट होईल. आसमानी व सुलतानी संकटावर मात करायची आहे. राज्यात आज अशी परिस्थिती झाली आहे की, आम्ही काही आरक्षणाविषयी बोलायला लागलो की त्याला लफडे ठरवले जाते आणि कुणी दुसरे काही बोलेल तर त्याला प्रेम ठरवले जाते.
लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे आज जिवंत असते तर या राज्यातील ओबीसींच्या आरक्षणाची बचाव करण्याची वेळ कधीच आली नसती. पुरोगामी महाराष्ट्राची ओळख असूनही आजही फाशी पारदे समाजातील महिलेला अंत्यसंस्कारासाठी जागा मिळत नाही, ही बाब लाजिरवाणी असल्याचे वक्त्यांनी नमूद केले. सूत्रसंचालन सुखदेव मर्दाने यांनी केले. आभार दादासाहेब वाघ यांनी मानले.
…तर रस्ता मोकळा राहणार नाही
मुख्यमंत्री उत्तर द्यायला तयार नाहीत. त्यांनीच ओबीसींचे आरक्षण संपवले. जरांगेसारख्या खुळखुळ्या माणसाने मोर्चा काढला तर रस्ते ठप्प होतात, पण गावगाड्यातील ओबीसी एक झाला तर रस्ता मोकळा राहणार नाही, असा इशाराही हाके यांनी दिला. ओबीसी समाजातील छोट्या छोट्या जातींनी एकमेकांशी भांडण थांबवावे आणि ओबीसी म्हणून एकत्र येणे गरजेचे असून सध्या ओबीसींच्या आरक्षणाचा काहीजण गैरवापर करत आहेत, अंगावरचे कपडे कोणीतरी काढून चालले आहेत. आता ओबीसी एकत्र आहेत आणि ही लढाईची वेळ आहे, संघर्ष करण्याची आज वेळ आली आहे. गोपीनाथ मुंडे यांनी सर्वसामान्य माणसाला स्वाभिमान दिला. आज समाजाला त्यांचीच जास्त गरज भासत आहे.




