पुणे | Pune
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक झालेल्या मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतल्या आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरू केले. या आंदोलनावर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी निशाणा साधत थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केला. मराठा आरक्षणाचा लढा हा केवळ आरक्षणासाठी नसून, राज्यातील सरकार उलथून टाकण्यासाठी एक राजकीय अजेंडा आहे. या कटात विरोधी पक्ष तर सामील आहेत, पण त्याचबरोबर अजित पवार गटाचे आमदार आणि खासदार देखील सहभागी आहेत, असा गंभीर आरोप केला आहे.
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेत जरांगेंच्या ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण मिळावे या मागणीवर सडकून टीका केली. ते म्हणाले की, ‘जरांगेची मागणी मान्य झाली तर मराठा समाजाचे आरक्षण संपेल. अनेक आमदार, खासदार हे जरांगे यांना पाठिंबा देत आहेत. ओबीसीच आरक्षण आमदार आणि खासदार याना संपवण्याचे आहे. जरांगे याना रेड कार्पेट घातले आहे. मी गेवराईला गेलो तर माझ्यावर एफआयआर दाखल केली.’
देवेंद्र फडणवीस यांचे सरकार उलथवून लावण्यासाठी आजपर्यंत विरोधी पक्ष प्रयत्न करत आहे, असे आम्ही सांगत होतो. मात्र, आज मी जबाबदारीने सांगतो की, सरकार उलथवण्यासाठी विरोधी पक्षासोबत अजित पवार यांचे आमदार आणि खासदार सामील आहेत. मी माझ्या पदरचे काहीही सांगणार नाही, मी हे जबाबदारीने सांगत आहे. मनोज जरांगे यांच्या आडून महाराष्ट्रातील सत्ताधारी आमदार, खासदार सरकार अस्वस्थ आणि बदलण्याचा प्रयत्न करत आहेत, असा गंभीर आरोप लक्ष्मण हाके यांनी केला.
या महाराष्ट्रात धुंदशाही जोमात सुरु आहे. पण लोकशाही कोमात आहे. झुंडशाहीचा जोरावर महाराष्ट्रातील ओबीसी रचना संपवण्याचा घाट टाकला जात आहे. मनोज जरांगेंच्या नावाच्या काडेपेटीचा ज्वालामुखी केला. हे काम सर्वपक्षीय आमदार खासदारांनी केल. जरांगे नावाच्या काडेपेटीला ओबीसीतून आरक्षण का पाहिजे? जरांगे हुकूमशाहा आहेत का? ते न्यायालयाला मानायला तयार नाहीत, असा घणाघात लक्ष्मण हाके यांनी केला.
हा आरक्षणाचा लढा नाही. मनोज जरागेंनी मुंबईकडे निघताना स्क्रिप्ट फोडली की मी सरकार उलथून लावणार असेही सांगितले होते. मी आमदार-खासदाराचा पोरगा नाही, मी चुकीचा असेल तर मला आतमध्ये टाका,” असे आव्हान लक्ष्मण हाकेंनी केले. “मी आत्महत्या करू का, म्हणजे प्रश्न सुटतील का?” असे भावनिक विधान करत हाकेंनी आपली व्यथा मांडली.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा





