मुंबई | प्रतिनिधी
राज्यात शाळा परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करण्यास मनाई असताना राज्यातील अनेक शाळांजवळ राजरोस गुटखा तसेच इतर तंबाखूजन्य पदार्थांची विक्री सुरू आहे. यामुळे लहान वयातील शाळकरी मुले व्यसनांच्या आहारी जात आहेत. ही बाब अतिशय गंभीर असून सरकारने शाळा परिसरात तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवरील बंदीची कठोर अंमलबजावणी करावी, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
राज्यातील वाढत्या गुटखा विक्रीसंदर्भात वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे लक्ष वेधले आहे. राज्यात गुटखा बंदीची कठोर अंमलबजावणी होत नसल्यामुळे सर्रास गुटखा विक्री सुरु आहे. गुटखा बंदीची अंमलबजावणी करण्याची संपूर्ण जबाबदारी अन्न आणि औषध प्रशासनाची आहे.
परंतु, या विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून ते स्थानिक पातळीवरील अधिकाऱ्यांपर्यंत भ्रष्ट साखळी निर्माण झाली आहे. गुटखा विक्रेते, गुटखा तस्कर, गुटखा उत्पादक, गुटखा वाहतूकदार यांच्याशी त्यांचे आर्थिक व्यवहार आहेत. जोपर्यंत भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई होत नाही, तोपर्यंत गुटखा बंदीची अंमलबजावणी होणार नाही, असे वडेट्टीवार यांनी पत्रात नमूद केले आहे.
राज्यातील ‘गुटखा बंदी’ भ्रष्ट साखळीच्या विळख्यात अडकली आहे. या भ्रष्ट साखळीच्या आर्थिक हितसंबंधामुळे सरकार गुटखा बंदीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी केला. शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी यांच्यावरील हल्ला हा गुटखा विक्रीला विरोध केल्यामुळेच झाला असून सरकारने आता तरी राज्यात गुटखा बंदीची कठोर अंमलबजावणी करावी, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे.