Tuesday, September 17, 2024
Homeराजकीयठाकरे गटाचे दोन खासदार शिवसेनेच्या संपर्कात; शिंदे गटातील 'या' नेत्याचा मोठा दावा

ठाकरे गटाचे दोन खासदार शिवसेनेच्या संपर्कात; शिंदे गटातील ‘या’ नेत्याचा मोठा दावा

नवी दिल्ली | New Delhi

- Advertisement -

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड केल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेला (Shivsena) मोठे भगदाड पडले होते. शिंदेंसोबत १२ खासदार आणि तब्बल ४० हून अधिक आमदार (MLA) गेल्याने ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेना खिळखिळी झाली होती. मात्र, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत ठाकरेंनी ९ खासदार निवडून आणत महाराष्ट्राच्या राजकारणात अद्याप आपला करिष्मा कायम असल्याचे दाखवून दिले आहे. त्यातच आता शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी ठाकरेंच्या शिवसेनेतील नव्याने निवडून आलेले काही खासदार संपर्क असल्याचे म्हटले आहे. ते दिल्लीत माध्यमांशी बोलत होते.

यावेळी बोलतांना म्हस्के म्हणाले की, “लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) ठाकरेंच्या शिवसेनेचे (Thackeray Shivsena) एकूण ९ खासदार (MP) निवडून आले आहेत. यापैकी दोन खासदार मुख्यमंत्री शिंदेंच्या संपर्कात आहेत. आपल्या मतदारसंघातील विकासकामे झाली पाहिजेत, अशी त्या खासदारांची इच्छा आहे. यासाठी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देतो असे सांगितले आहे. मुल्ला मौलवींना पैसे देऊन मते विकत मिळवण्याची उद्धव ठाकरेंची भूमिका आम्हाला पटलेली नाही, असं या खासदारांनी आम्हाला सांगितल्याचे म्हस्के यांनी म्हटले आहे.

तसेच पक्षांतर बंदीची कारवाई रोखण्यासाठी या दोन खासदारांनी प्लॅनही आखला आहे, आम्ही सहा खासदारांची लवकरच संख्या जमवतो आणि लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नरेंद्र मोदींना (Narendra Modi) साहेबांना पाठिंबा देऊ, असेही ते दोन खासदार म्हणाल्याचा दावा म्हस्के यांनी केला आहे.

दरम्यान,नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी केलेल्या दाव्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेत मोठी खळबळ उडाली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर शिंदेंच्या शिवसेनेतील अनेक आमदार माघारी येतील, अशी चर्चा होती. मात्र, आता शिंदेंच्या शिवसेनेकडून ठाकरेंच्या शिवसेनेचे नव्याने निवडून आलेले खासदारच फोडण्याची तयारी सुरु झाल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात नवा भूकंप होणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या