औरंगाबाद – aurangabad
घरात आलेल्या आपत्तीनंतर स्त्री कायम खंबीरपणे घर सांभाळते. तिला फक्त गरज असते पाठीशी उभे राहून आधार देण्याची मानसिकता समाजाने ठेवली तरी एकल महिला आत्मविश्वासाने जगू शकतील, असे मत कृतिशील आणि अभ्यासू कार्यकर्त्या ॲड.निशा शिवूरकर (Adv. Nisha Shivurkar) यांनी मांडले. त्यांचे एकल महिलांकडे समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन या विषयावर व्याख्यानाचे (Lecture) आयोजन शहरातील स्वामी रामानंद तीर्थ सभागृह (Swami Ramanand Tirtha Hall), नागेश्वरवाडी येथे सजग महिला संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आले होते.
एकल महिला असणे हे काही वाईट नाही. अनेकदा एकटे राहण्याचा निर्णय महिला स्वतः घेतात. या निर्णयाचा आदर समाजाने करायलाच हवा. जेव्हा समाज महिलेचा नकाराधिकार पचवू शकत नाही, तेव्हा समाजात हिंसा घडत असते. आज समाजात हिंसा सर्व स्तरात रूजताना दिसत आहे. त्यामुळे महिलांवर सुसंस्कृत समाज घडविण्याची जबाबदारी वाढली आहे, असे शिवूरकर यांनी नमूद केले.
प्रारंभी त्यांनी स्त्री चळवळीचा आढावा घेतला. महात्मा गांधी यांचे स्त्री मुक्तीबाबतचे विचार सांगत त्यांची आजच्या काळातील गरज विषद केली. एकल महिलांचे आधिकार, कायदे याबाबतही त्यांनी सविस्तर मांडणी केली. स्त्रीवादी चळवळी आणि महिलांचे प्रश्न यात खूप अंतर आहे. यांचा सुवर्णमध्य साधणे गरजेचे असून स्त्रीयांच्या चळवळींनी आपल्या कक्षा रूंदावणे, काळानुसार नव्या प्रश्नांवर उत्तरे शोधणे महत्त्वाचे आहे, असेही त्या म्हणाल्या.
प्रास्ताविक डॉ. आरतीश्यामल जोशी यांनी केले तर आभार सुनीता जाधव यांनी मानले. यावेळी मंगल खिवंसरा, रश्मी बोरीकर, डॉ. स्मिता अवचार, मनोरमा शर्मा, निर्मला जाधव, संगीता गुणारी, आशा देशपांडे-शिवूरकर, अनिता शिवूरकर, ज्योती गिरी, सुनिता मुंगीकर, शाहिन खान आदींची उपस्थिती होती.