अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
विधानसभा निवडणूक लढविणार्या उमेदवारांना अंतिम खर्चाचा हिशोब द्यावा लागणार आहे. उमेदवारांना खर्च सादर करण्यासाठी 23 डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. दरम्यान, खर्च तपासणीस गुरूवारपासून सुरूवात झाली आहे. त्यासाठी नियुक्त केलेले केंद्रिय निवडणूक आयोगाचे निवडणूक खर्च निरीक्षक देवांशी विश्वास, अरूण चौधरी आणि जयंतकुमार हे अहिल्यानगरमध्ये दाखल झाले आहेत. निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणूक खर्चासाठी 40 लाखांची मर्यादा दिली होती. जिल्ह्यातील 12 विधानसभा मतदारसंघांतून 151 उमेदवार निवडणुकीत होते. उमेदवारांनी अर्ज दाखल केलेल्या तारखेपासूनच खर्चाच्या सर्व नोंदी ठेवणे बंधनकारक होते. उमेदवारांना खर्चाच्या नोंदीसाठी एक स्वतंत्र बँक खाते उघडावे लागले.
या खात्यातूनच खर्च करावा लागत होता. उमेदवाराने आयोजित केलेल्या मिरवणुका, प्रचार सभा या कार्यक्रमांचे आयोगाच्या वतीने चित्रीकरण केले जात होते. प्रचार सभांसाठी किती खुर्च्या आहेत ? व्यासपीठ, हार, टोप्या, पंच आदी बाबींचे चित्रीकरण केले जात होते. आयोगाने दर निश्चित केलेल्या दरापेक्षा कमी दर एखाद्या उमेदवाराने दाखविल्यास तो खर्च निवडणूक निरीक्षक मान्य करत नव्हते. पहिल्याच टप्प्यात अनेक उमेदवारांच्या खर्चामध्ये तफावत आढळून आली होती.
दरम्यान, आतापर्यंत दोन वेळा खर्चाची पडताळणी झालेली आहे. विधानसभा निवडणूक निकालानंतर एक महिन्याच्या आतमध्ये अंतिम खर्च सादर करणे बंधनकारक आहे.
खर्च सादर न केल्यास संबंधित उमेदवारास सहा वर्षांसाठी निवडणूक लढविण्यास प्रतिबंध करण्याची तरतूद आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य वित्त व लेखाधिकारी तथा निवडणूक खर्च नोडल शैलेश मोरे यांच्या नेतृत्वाखाली सहायक नोडल अधिकारी सचिन धस, राजू लाकूडझोडे, जे. एम. सहारे, बाबासाहेब घोरपडे, योगेश झांबरे, महेश कावरे, सुरेंद्र पवार, गणेश खेडकर, अतुल कुलकर्णी, रोहन मरकड, संजय आगलावे यांचे पथक खर्चाची पडताळणी करत आहे.