श्रीगोंदा |प्रतिनिधी| Shrigonda
राज्यात महायुतीचे सरकार असून महायुतीत भाजप, अजित पवार राष्ट्रवादी आणि मुख्यमंत्री शिंदे यांची शिवसेना एकत्र आहेत. श्रीगोंदा मतदारसंघात तूल्यबळ असणार्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने श्रीगोंदा मतदारसंघावर दावा केला आहे. तालुक्यात राष्ट्रवादीचे सूत्र नागवडे परिवाराकडे असून त्यांनी गत विधानसभेला विखेंच्या शब्दावर भाजपच्या व्यासपीठावर येत विद्यमान लोकप्रतिनिधी यांचा प्रचार केला होता. यामुळे यंदा त्यांनी गेल्या पंचवार्षिकच्या मदतीची परतफेड करण्याची मागणी केली आहे. यामुळे विद्यमान लोकप्रतिनिधीची अडचण झाली असून महायुतीकडून याठिकाणी कोणाला उमेदवार मिळणार याकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे.
श्रीगोंदा तालुक्याच्या राजकारणाची दखल राज्यात घेतली जाते. राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांनी या मतदारसंघात कायम लक्ष दिलेले आहे. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही मतदारसंघावर लक्ष असल्याने गत निवडणुकीत याठिकाणी पहिल्यांदा भाजपचे कमळ फुलले. याठिकाणी 2014 आणि नंतर 2019 मध्ये भाजपकडून बबनराव पाचपुते निवडून आले. या दोन्ही वेळी त्यांना एकतर्फी निवडणूक होईल, असे वाटत असताना राष्ट्रवादीचे तत्कालीन उमेदवार घनशाम शेलार यांनी दिलेली लढत ही जनतेच्या लक्षात आहे. निवडणुकीत कमी फरकाने शेलार यांचा पराभव झाला होता. 2019 च्या निवडणुकीत राजेंद्र नागवडे यांनी कर्जत तालुक्यात देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला.
यावेळी तत्कालीन खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांच्या शब्दावर महायुती उमेदवाराच्या प्रचारात उतरलो असून भाजप उमेदवार विजयी होणार असल्याचे नागवडे यांनी सांगितले होते. मात्र, या बदल्यात भाजपने कोणता शब्द दिला हे नागवडे यांनी स्पष्ट केले नव्हते. यंदा नागवडे परिवार महायुती घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीमध्ये आहेत. मागील वर्षी हुकलेली संधी यंदा हेरून पुन्हा विधानसभेच्या निवडणुकीत ताकदीनिशी उतरण्याची तयारी नागवडे परिवाराने केलेली आहे. यासाठी अजित पवार यांच्या उपस्थितीत तालुक्यात त्यांनी मोर्चे बांधणीला सुरूवात केलेली आहे. अनुराधा नागवडे विधासभेसाठी इच्छुक असून पाच वर्षांपासून त्यांची तयारी सुरू आहे. यामुळे मागील विधानसभा निवडणुकीसाठी दिलेला शब्द यंदा पूर्ण होणार का? याबाबत तालुक्यात चर्चा सुरू आहे.
विखे पाटील यांच्या भूमिकेकडे लक्ष
माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांची श्रीगोंदा विधानसभा निवडणुकीचे तिकीट देताना कोणती भूमिका असणार आहे. याकडेही अनेकांच्या नजरा राहणार आहे. तालुक्यातील एका नेत्याकडे पगारी असलेल्या ‘राजेश्वर’ याने तालुक्यासह माहिती देत कोणाची भूमिका काय आहे, त्यांचा कसा त्रास होतो हे वरिष्ठ नेत्यांना सांगण्याचा प्रयत्न केला. पण वरिष्ठांनी त्याचे ऐकून घेण्याऐवजी त्याचेच कान टोचले.