Friday, September 20, 2024
Homeनगरविधानसभेसाठी शेवगाव तालुक्यात जनसंपर्काच्या माध्यमातून मतपेरणी

विधानसभेसाठी शेवगाव तालुक्यात जनसंपर्काच्या माध्यमातून मतपेरणी

राजकीय वातावरण निर्मितीसाठी वेगवेगळे उपक्रम || यंदा चौरंगी लढतीची शक्यता

शेवगाव |शहर प्रतिनिधी| Shevgav

- Advertisement -

लोकसभेपाठोपाठ होणार्‍या विधानसभा निवडणुकीचे वेध आता सर्वच राजकीय पक्षातील इच्छुकांना लागले असून त्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून जनसंपर्क अभियानास गती दिल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. यामुळे शेवगाव तालुक्यात राजकीय वातावरण निर्मितीस पुन्हा सुरूवात करण्यात आली असल्याचे दिसत आहे. दरम्यान, यंदा विधानसभा निवडणुकीसाठी शेवगाव-पाथर्डी मतदारसंघात चौरंगी लढत होण्याची शक्यता असून त्यादृष्टीने शेवगाव तालुक्यातील सर्वच नेते कार्यकर्त्यांसह कामाला लागले आहेत.

माजी आमदार घुले बंधूंनी परिवर्तन जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून तर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे प्रदेश सचिव अ‍ॅड. प्रतापराव ढाकणे यांनी शिवार फेरीच्या माध्यमातून शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गाव व वाड्या वस्तीवर कार्यकर्त्यांसह जाऊन तेथील नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी प्रयत्नपूर्वक काम करण्याचा निर्धार जाहीर केला आहे. माजी आ. चंद्रशेखर घुले यांनी तालुक्यातील ढोरसडे येथे पार पडलेल्या परिवर्तन जनसंवाद यात्रेत मतदारसंघाच्या विद्यमान आ. मोनिका राजळे यांच्या कार्यपद्धतीवर टीकेची तोफ डागली. गेल्या दहा वर्षात मतदारसंघ विकासाच्या बाबतीत इतर तालुक्याच्या तुलनेत मागे गेल्याची खंत व्यक्त करत, येत्या विधानसभा निवडणुकीत जनतेने परिवर्तनासाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले.

विद्यमान आमदारांनी शेवगाव तालुक्याच्या तोंडाला विकासाच्या बाबतीत पाने पुसल्याचा रोखठोक आरोप त्यांनी केला. आज बुधवारी तालुक्यातील मुरमी शेकटे वाडगव्हाण येथे परिवर्तन जनसंवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. एकंदरित घुले व ढाकणे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकल्याचे दिसून येत आहे. याशिवाय हर्षदा काकडे यांनीही पाणी परिषदेच्या माध्यमातून आ. राजळे यांच्यावर टीकेची झोड उठविल्याने सर्वच इच्छुकांनी आपापल्या प्रचार कार्याला वेग दिल्याचे चित्र दिसून येत आहे.

घुलेंच्या डोक्यात काय? कार्यकर्त्यांमध्ये चर्चा
शेवगाव-पाथर्डी मतदारसंघात भाजपच्या विद्यमान आ. मोनिका राजळे यांच्या विरोधात पाथर्डीतून प्रताप ढाकणे, तर शेवगावमधून माजी आ. चंद्रशेखर घुले आणि हर्षदा काकडे जोरदारपणे विधानसभेची तयारी करत आहेत. मागील निवडणुकीत ढाकणे यांनी राजळे यांना जोरदार टक्कर दिली होती. यंदा देखील त्यांची तयारी जोरात आहे. मात्र, घुले यांच्या भूमिकेबाबत संभ्रम असून आधी उपमुख्यमंत्री अजित पवार गटात असणारे घुले लोकसभेच्या निकालानंतर शांत झाल्याचे दिसत असून त्यांचे समर्थक देखील अजित पवार गटाच्या बैठका आणि मेळावाकडे कानाडोळा करत असल्याने घुले यांच्या डोक्यात काय सुरू आहे, कळण्यास मार्ग नसल्याचे त्यांच्याकार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या