Friday, September 20, 2024
Homeनगरविधानसभेसाठी स्वत:चे नाव पुढे रेटणारा ‘युवराज’ नापसंत!

विधानसभेसाठी स्वत:चे नाव पुढे रेटणारा ‘युवराज’ नापसंत!

श्रीगोंद्यात महिला नेत्यांच्या नावाला सर्वेक्षणात सर्वाधिक पसंती

श्रीगोंदा |प्रतिनिधी| Shrigonda

- Advertisement -

श्रीगोंदा-नगर विधानसभा मतदारसंघात निवडणूक पूर्व सर्वेक्षण समोर आले आहे. यात विधानसभा निवडणुकीत आपले नाव पर्यायी उमेदवार म्हणून पुढे रेटणार्‍या युवा नेत्याच्या नावाला मतदारसंघातील बहुतांशी मतदारांनी नापसंत ठरवत, ‘युवराज’ तुम्ही थांबा, असे मत नोंदवले आहे. विशेष म्हणजे बहुतांशी मतदारांनी मतदारसंघात बदल करण्याचे संकेत देत महिला नेत्यांना पसंती दिल्याचे समोर आले आहे. यामुळे श्रीगोंद्यातील ‘त्या’ युवा नेत्यांची मोठी गोची झाली आहे.

श्रीगोंदा मतदारसंघात कायम चर्चेत असणार्‍या पाचपुते, नागवडे, जगताप या बड्या नावाभोवती विधानसभेचे गणित अवलंबून असताना मागील पंचवार्षिक निवडणुकीत शरद पवार यांच्या खेळीने ऐनवेळी नाव पुढे येऊन लढलेले घन:श्याम शेलार याचा निसटता पराभव झाला. मात्र, त्यानंतरही आजपर्यंत या मतदारसंघावर राष्ट्रवादीचा प्रभाव असल्याचे चित्र आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ते अनुभवात आले. मतदारसंघातून निलेश लंके यांना विक्रमी मताचे दान करत श्रीगोंदा मतदारसंघावर पुन्हा शरद पवार यांचा वरचष्मा असल्याचे दाखवून दिले. याठिकाणी भाजपचा विद्यमान आमदार असतानाही महायुतीच्या उमेदवाराच्या पारड्यात मते टाकण्यात तालुक्यातील महायुतीचे उमेदवार अपयशी ठरले. यामुळे होणार्‍या विधानसभा निवडणुकीत हा मतदारसंघ नेमका कुणाच्या वाट्याला जातो हे अजून स्पष्ट नाही.

मात्र, तालुक्यातील प्रमुख नेत्यांच्या नावाने वेगवेगळे सर्व्हे मात्र जोरात सुरू आहेत. यात नागवडे, पाचपुतेंसोबत माजी आमदार राहुल जगताप, शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे साजन पाचपुते,घनश्याम शेलार, अण्णासाहेब शेलार, सुवर्णा पाचपुते, ऐनवेळी शिवाजी कर्डिलेच्या कुटुंबातील सदस्य यांच्या नावाभोवती श्रीगोंदा आणि नगर तालुक्यातील गावात सर्वेक्षण फिरत आहेत. यात विशेष म्हणजे आमदार म्हणून विधानसभा निवडणुकीत आमदाराच्या पुत्राच्या नावाला मात्र सर्व्हेत ब्रेक लावल्याचे दिसत आहे. स्वत:चे पर्यायी म्हणून नाव पुढे करत आपल्या नावाचं ब्रँडिंग जरी करण्याचा प्रयत्न हा युवा नेता करत असला तरी पक्षातून मोठा विरोध असल्याचे चित्र आहे. यापुढे जाऊन अनेक वेगवेगळ्या सर्वेक्षणात देखील या युवा नेत्याच्या नावाला ब्रेक लावल्याचे दिसत आहे. अनेकांनी यापूर्वी युवा नेत्यावर भरोसा दाखवला होता. पण मधल्या काळात हा युवा नेता कुणाच्या संपर्कातच नव्हता. आता निवडणूक समोर ठेऊन या युवा नेत्याचे उमेदवारी आपल्या पदरात पडते का? यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

… तर मिळेल पहिल्यांदा महिला आमदार होण्याचा मान
श्रीगोंदा मतदारसंघात बदल हवा असे अनेकांचे मत असताना आता महिला आमदार होण्यासाठी सक्षम माहिला नेतृत्व पुढे आले तर बदल होऊन इतिहासात पहिल्यांदा या मतदारसंघात महिला आमदार प्रतिनिधी होण्याचा मान मिळण्याची शक्यता आहे. येणार काळच श्रीगोंदा तालुक्याचे भवितव्य ठरवणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या