अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
राज्यात पुन्हा एखादा निवडणुकीचा धुरळा उडणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका झाल्यानंतर आता विधानपरिषदेच्या रिक्त जागांसाठी निवडणुकीची शक्यता आहे. पावसाळी अधिवेशनाआधी विधानपरिषदेच्या 17 जागांसाठी निवडणुका होणार असून यात नगरच्या जागेचा समावेश राहणार की नाही, याबाबत संभ्रम आहे. दरम्यान, डिसेंबर 2025 ला जिल्ह्यातील पालिका व अहिल्यानगरच्या महापालिकेची निवडणूक झालेली असून ही निवडणूक झाल्यानंतर जिल्हा निवडणूक विभागाने विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी पात्र असणार्या मतदारांची (निवडून आलेले नगरसेवक) यांची माहिती राज्य निवडणूक आयोगाला सादर केलेली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधानपरिषदेच्या 17 जागांसंदर्भात लवकरच निवडणूक जाहीर होण्याच्या हालचाली सुरू असून नगर जिल्ह्यातील विधानपरिषदेच्या रिक्त जागेचा समावेश आहे. मात्र, या जागेसाठी निवडणूक होणार की नाही, याबाबत मतभिन्नता आहे. नगर जिल्ह्यात विधानपरिषदेचे मतदार असणारे जिल्हा परिषद सदस्यांच्या 75 आणि पंचायत समितीच्या सभापतींच्या 14 अशा मतदारांच्या 89 जागा सध्या रिक्त आहेत. एकूण मतदारांपैकी नगर जिल्ह्यात 89 जागा रिक्त असतांना विधानपरिषदेसाठी निवडणूक होणार का? की नगर वगळून ज्या ठिकाणी जिल्हा परिषद, नगर पालिका आणि महापालिकांच्या निवडणूका झालेल्या आहेत, त्या ठिकाणी विधानपरिषदेची निवडणूक होणार याबाबत राज्य पातळीवर निर्णय होणार असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले.
राज्यात विधानपरिषदेच्या आमदारांची मागील अडीच वर्षांपासून निवडणूका झालेल्या नाहीत. यात नगरच्या जागेचा समावेश आहे. मात्र, जिल्ह्यात 2022 पासून स्थानिक स्वराज्य संस्स्थांच्या (झेडपी आणि पंचायत समितीच्या) रखडलेल्या निवडणूकामुळे जिल्ह्यातील विधान परिषदेची जागा रिक्त आहे. दुसरीकडे डिसेंबर 2025 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संपन्न झाल्या आहे. यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात किमान 75 टक्के मतदार उपलब्ध असणार आहेत. ही अट पूर्ण झाल्याने निवडणुकीची प्रकियेस सुरुवात होण्याची शक्यता आहे. यात नगरच्या जागेचा समावेश असणार की नाही, याबाबत मतभिन्नता आहे.
दरम्यान, विधानपरिषद निवडणुकीसाठी जिल्ह्यातील महापालिका, नगर पालिका आणि नगर परिषदेचे लोकनियुक्त सदस्य अथात मतदारांची संख्या जिल्हा निवडणूक शाखेने राज्य निवडणूक आयोगाला पाठवली आहे. यात 12 पालिकांमधील 289 नगरसेवक, अहिल्यानगर पालिकेतील 73 अशा 362 नगरसेवकांचा समावेश आहे. ही संख्या एकूण मतदारांच्या 70 टक्क्यांपेक्षा अधिक आहे.
इच्छुकांकडून चाचपणी
विधानपरिषदेच्या एकूण 78 सदस्य संख्येपैकी 22 सदस्य स्थानिक स्वराज्य संस्थांद्वारे निवडून जात असतात. यापैकी सध्या 17 जागा रिक्त आहेत. त्यामुळे या मतदारसंघात निवडणुका होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीकडे राजकीय पक्षाचं लक्ष लागलं आहे. पावसाळी अधिवेशनापूर्वी निवडणुका पार पडल्यास विधानपरिषदेतील राजकीय चित्र बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. स्थानिक स्वराज संस्थांमधील सत्तासमीकरणाचा परिणाम विधानपरिषदेच्या निवडणुकीवर पाहायला मिळण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत कोणत्या पक्ष बाजी मारेल, हे निवडणुकीनंतरच स्पष्ट होईल. तसेच या निवडणुकीसाठी आपला नंबर लागणार का? याची चाचपणी इच्छुकांकडून सुरू झाली आहे.
तनपुरेंना संधी ?
नगर जिल्ह्यातील विधान परिषदेच्या जागेवर दिवंगत नेते अरूण जगताप यांनी आमदार म्हणून काम केले. त्यांची मुदत संपल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका न झाल्याने नगरची जागा रिक्त आहे. दरम्यान, या जागेवर आता राहुरीचे माजी आ. प्राजक्त तनपुरे यांना भाजप महायुतीकडून संधी मिळणार का? याबाबत चर्चा सुरू आहे. राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत तनपुरे यांनी माघार घेतल्याने तनपुरे यांना विधानपरिषदेवर संधी मिळणार असल्याची चर्चा त्यांच्या समर्थकांमध्ये आहे.





