अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
विमान तिकीट खरेदी व्यवसायातून खात्रीशीर परतावा व मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका व्यावसायिकाची तब्बल 43 लाख 43 हजार रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात बुधवारी (5 ऑगस्ट) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आदेश लुमाजी चेमटे (वय 34, रा. इंद्रप्रस्थ कॉलनी, व्हिडीओकॉन कंपनीच्या पाठीमागे, नागरदेवळे, ता. अहिल्यानगर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून अजयकुमार बाळासाहेब जगताप (रा. संभाजी कुस्ती केंद्रासमोर, भिस्तबाग, गोकुळनगर, अहिल्यानगर) याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 18 जुलै 2022 ते 4 नोव्हेंबर 2022 या कालावधीत बुर्हानगर व गुलमोहर रोड परिसरात संशयित आरोपीने फिर्यादीचा विश्वास संपादन केला. ‘लिओ हॉलीडेज’ या नावाने विमान तिकिटे खरेदी करण्याच्या व्यवसायात गुंतवणूक केल्यास खात्रीशीर परतावा मिळेल तसेच मोठ्या प्रमाणात नफा मिळवून देण्याचे आश्वासन संशयित आरोपीने दिले.
या विश्वासावर फिर्यादीने वेळोवेळी रोख रक्कम तसेच धनादेशाव्दारे एकूण 98 लाख रूपये आरोपीला दिले. त्यापैकी आरोपीने 54 लाख 57 हजार रूपये परत केले. मात्र, उर्वरित 43 लाख 43 हजार रूपये परत न करता त्यांची फसवणूक केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. फिर्यादीच्या अर्जाची चौकशी पूर्ण झाल्यानंतर त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुहास आव्हाड करीत आहेत.




