Monday, June 24, 2024
Homeनगरफसवणुकीची रक्कम एक कोटीच्या घरात; संशयित पसार

फसवणुकीची रक्कम एक कोटीच्या घरात; संशयित पसार

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

लिओ हॉलीडेज टूर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्स या कंपनीत गुंतवणूक केल्यानंतर चांगल्याप्रकारे मोबदला देण्याचे आमिष दाखवून नगरमधील गुंतवणूकदारांची 83 लाख 61 हजारांची फसवणूक केल्याचे समोर आले होते. फसवणुकीचा आकडा आता एक कोटीच्या घरात गेला आहे. आतापर्यंत सात ते आठ गुंतवणूकदारांनी पोलिसांशी संपर्क केला असून फसवणुकीची रक्कम आणखी वाढण्याची शक्यता आहे.

गुंतवणूकदारांची 83 लाख 61 हजारांची फसवणूक केल्याने मानसी कौस्तुभ घुले (रा. शिवाजीनगर, कल्याण रस्ता) यांच्या फिर्यादीवरून लिओ हॉलीडेज टूर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्स या कंपनीचा संचालक अजयकुमार बाळासाहेब जगताप, जयश्री बाळासाहेब जगताप (दोघे रा. गोकुळनगर, भिस्तबाग, सावेडी ) व रुपाली विजय मुनोत (रा. बालिकाश्रम रस्ता, नगर) यांच्या विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील करत आहेत. गुन्हा दाखल होताच अजयकुमार जगताप, जयश्री जगताप, रुपाली मुनोत हे पसार झाले आहेत. पोलिसांनी त्यांच्या घरी शोध घेतला असता ते मिळून आलेले नाहीत. ते परदेशात पळून जाण्याची शक्यता असून त्यांच्या विरोधात लुक आऊट नोटीस जारी करण्याची प्रक्रिया पोलिसांनी सुरू केली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक यादव यांनी दिली.

रुपाली मुनोत हिने फिर्यादीची ओळख अजयकुमार जगताप, जयश्री जगताप यांचेशी करून दिली होती. त्यांच्यावर विश्वास ठेऊन फिर्यादीने लिओ हॉलीडेज टूर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्स कंपनीत गुंतवणूक केली होती. फिर्यादी यांच्यासह त्यांच्या नातेवाईक व मैत्रीणी यांनीही कंपनीत गुंतवणूक केली होती. तसेच शिवाजीनगर, कल्याण रस्ता, पारनेर तालुक्यातील व नवी मुंबई येथील काही व्यक्तींनी यात गुंतवणूक केली होती. हा आकडा सुरूवातीला 83 लाख 61 हजार रुपये होता. यामध्ये वाढ झाली असून सुमारे एक कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे आता समोर आले आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या