Saturday, May 9, 2026
HomeनगरLeopard News : पिंजर्‍याला हुलकावणी देणारा 'तो’ बिबट्या अखेर जेरबंद

Leopard News : पिंजर्‍याला हुलकावणी देणारा ‘तो’ बिबट्या अखेर जेरबंद

लोणी |वार्ताहर| Loni

राहाता तालुक्यातील लोणी बुद्रुक परिसरातील शेतकर्‍यांना गेल्या अनेक दिवसांपासून सतावणारा आणि पिंजर्‍याला सतत हुलकावणी देणारा एक 14 वर्षांचा नर बिबट्या अखेर वनविभाग आणि प्राणीमित्रांच्या प्रयत्नाने जेरबंद झाला आहे. बिबट्या जेरबंद झाल्यामुळे परिसरातील भीतीचे वातावरण काहीसे निवळले असले तरी आणखी बिबटे परिसरात असल्याने नागरिकांनी पुन्हा पिंजरा लावण्याची मागणी केली आहे.

- Advertisement -

गेल्या पंधरा दिवसांपासून बिबट्याला पकडण्यासाठी लोणी बुद्रुक येथील जनसेवा कार्यालयाजवळील हळपट्टी शिवारात माधुरी सुनील वाबळे यांच्या गट नंबर 472 या शेतात वनविभागाने पिंजरा लावला होता. गेल्या काही महिन्यांपासून या बिबट्याने परिसरातील पाळीव कुत्रे, शेळ्या आणि कालवडी यांचा फडशा पाडल्याने ग्रामस्थांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली होती. गावातील अक्षय वाबळे आणि राम कोते यांनी केलेल्या मागणीनुसार वनविभागाने तातडीने पिंजरा उपलब्ध करून दिला होता. सुरुवातीला पिंजर्‍यात भक्ष्य म्हणून कोंबड्या ठेवल्या, मात्र बिबट्या आकर्षित झाला नाही. त्यानंतर काही दिवस शेळी ठेवून पाहिली, तरीही बिबट्या जेरबंद होत नव्हता.

अखेर काल संध्याकाळी भक्ष्य म्हणून पिंजर्‍यात कुत्र्याचे पिल्लू ठेवण्यात आले. पहाटे 5 वाजेच्या सुमारास पिंजर्‍याचा दरवाजा लागल्याचा आवाज आला आणि ग्रामसेवक सुनील वाबळे, अभिनय कोते, शिंदे व बर्डे यांनी धाव घेऊन बिबट्या जेरबंद झाल्याची खात्री केली आणि लगेच प्राणीमित्र विकास म्हस्के यांना माहिती दिली. माहिती मिळताच विकास म्हस्के आणि वनरक्षक संजय साखरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी अहील्यानगरचे उपवनसंरक्षक धर्मवीर शालविठ्ठल, सहाय्यक उपवनसंरक्षक गणेश मिसाळ, संगमनेरचे सहाय्यक उपवन संरक्षक अमरजित पवार, वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश रोडे यांना घटनेची माहिती दिली. वरिष्ठ अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली संजय साखरे, विकास म्हस्के, विलास डगळे आणि मंजाबापू खेमनर यांनी पंचनामा करून बिबट्यासह पिंजरा तातडीने हलवण्याची कार्यवाही केली.

दरम्यान बिबट्या जेरबंद झाल्याची बातमी वार्‍यासारखी पसरताच बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. या गर्दीला पांगवण्यासाठी मंगेश दिघे, सी. एम. विखे, अभिनय कोते, नाना धावणे, संदीप भोकनळ, राम कोते, अक्षय वाबळे, सुभाष दिघे, नकुल कटारे, श्रीपाद दिघे, रमेश विखे, गोरक्ष विखे, संजय दिघे, शैलेश विखे, सुरज कुरकुटे, राहुल दिवटे, डॉ. मुसळे या ग्रामस्थांनी मदत केली. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. महेश भालेराव यांनी बिबट्याची वैद्यकीय तपासणी केली असून जेरबंद बिबट्यास शासकीय रोपवाटिकेत ठेवण्यात आले आहे.

एक बिबट्या जेरबंद झाला असला तरी परिसरात आणखी एक ते दोन मोठे बिबटे मुक्त संचार करत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. हा बिबट्या पकडल्यानंतर लगेचच दुसरा बिबट्या पिंजर्‍याभोवती चक्कर मारताना कोते आणि वाबळे यांनी पाहिला. त्यामुळे वनविभागाने तात्काळ याच ठिकाणी पुन्हा पिंजरा लावावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar Crime : पहाटे जुगार अड्ड्यावर छापा; 29 जण पकडले

0
अहिल्यानगर (प्रतिनिधी) शहरातील मध्यवर्ती भागात कोतवाली पोलीस ठाणे हद्दीत सुरू असलेल्या तीनपत्ती जुगार अड्ड्यावर भिंगार कॅम्प पोलिसांनी धाड टाकत 29 जणांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून...