आश्वी (वार्ताहर)
संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक परिसरात बिबट्याने शुक्रवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास आपल्या घरामागील शेतात कामासाठी गेलेल्या एका ५९ वर्षीय महिलेवर प्राणघातक हल्ला केला. या भीषण हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली असून, सध्या त्यांच्यावर प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सुमन बाळासाहेब खेमनर (वय ५९) या शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे जनावरांसाठी घास कापण्यासाठी घरामागील शेतात (गट नंबर २३१) चालल्या होत्या. यावेळी शेताशेजारील ङ्गगिनी गवताफमध्ये दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर झडप घातली. अचानक झालेल्या या हल्ल्याने त्या घाबरल्या, मात्र त्यांनी डगमगून न जाता आरडाओरडा करत बिबट्याचा प्रतिकार केला. महिलेच्या आक्रमक पवित्र्यामुळे बिबट्याने तेथून पळ काढला, मात्र, तोपर्यंत त्यांच्या हाताच्या दंडाला खोलवर जखमा झाल्या होत्या.
सुमन यांचा आरडाओरडा ऐकून त्यांचा मुलगा सुभाष खेमनर, किशोर पिलगर, शरद खेमनर, विशाल जऱ्हाड आदिसह स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळाकडे धाव घेतली. जखमी अवस्थेतील सुमन यांना तात्काळ निमगाव जाळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. तेथे आरोग्य अधिकारी डॉ. तय्यब तांबोळी यांनी प्राथमिक उपचार केले. मात्र, जखमा खोलवर असल्याने आणि मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाल्यामुळे त्यांना पुढील उपचारांसाठी लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
गेल्या काही दिवसांपासून आश्वी परिसरात बिबट्यांचा वावर लक्षणीयरीत्या वाढला असून मागील आठवड्यात उंबरी -आश्वी शिवेलगत बिबट्याने तिघांवर हल्ला केला होता. पाळीव प्राण्यांनंतर आता थेट मानवावर हल्ले होत असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर वनविभागाने तातडीने या परिसरात पिंजरा लावून या हल्लेखोर बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी आग्रही मागणी भाऊसाहेब खेमनर, संदीप खेमनर, अण्णासाहेब खेमनर, अशोक जहऱ्हाड, राहुल हळनोर यांच्यासह स्थानिक नागरिकांनी केली आहे.




