पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner
सिद्धेश्वरवाडी (Siddheshwarwadi) रस्त्यावरील बारामती ग्रो परिसरात सोमवारी (दि. 8) रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास एका तीन वर्षीय बालकावर बिबट्याने हल्ला (Leopard Attack) करून त्याला जंगलाकडे ओढून नेल्याची धक्कादायक घटना घडली होती. मंगळवारी (दि. 9) सकाळी घटनास्थळापासून एक किलोमीटर अंतरावर झाडाझुडपात त्याचा मृतदेह (Dead Body) आढळला.
अमन पन्नूलाल खोटे (वय 3) असे मृत्यू झालेल्या बालकाचे नाव आहे. बांधकाम मजूर असलेल्या परप्रांतीय कुटुंबातील अमन लघुशंकेसाठी घराबाहेर आला असताना, आईच्या डोळ्यासमोरच बिबट्याने (Leopard) त्याच्यावर झडप घेतली. स्थानिकांनी तात्काळ वनविभागाला याबाबत माहिती दिली. वनविभागाने युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू केली, ज्यात स्थानिक नागरिकही सहभागी झाले. रात्री उशिरापर्यंत शोधकार्य सुरू होते. मंगळवारी सकाळी आठ वाजता सिद्धेश्वरवाडी परिसरातील जंगलात, घटनास्थळापासून एक किलोमीटर अंतरावर झाडाझुडपात अमनचा मृतदेह (Dead Body) आढळला. शोधमोहिमेत वनपरिक्षेत्र अधिकारी जी. व्ही. धाडे, वनपाल एम. वाय. शेख, वनरक्षक अफसर पठाण, फारुख शेख, कानिफनाथ साबळे, एस. के. कारले, साहेबराव भालेकर, अंकराज जाधव यांनी सहभाग घेतला.
बिबट्याला पकडण्यासाठी परिसरात पिंजरे (Cage) लावण्यात आले असून, गस्त वाढवली आहे. यापूर्वी 2 सप्टेंबरला कळस येथेही अशीच दुर्दैवी घटना घडली होती. एका आठवड्यात तालुक्यातील दोन घटनांमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पाळीव प्राण्यांवरील बिबट्याच्या हल्ल्यांमुळेही चिंता वाढली आहे. वन्यप्राण्यांचा मानवी वस्तीत वाढता प्रवेश चिंताजनक ठरत आहे. वन विभागाने (Forest Department) नागरिकांना रात्री सावध राहण्याचे आणि मुलांना एकटे न सोडण्याचे आवाहन केले आहे. या घटनेचा तपास सुरू असून, परिसरात सतर्कता बाळगण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.




