राहुरी (तालुका प्रतिनिधी)
राहुरी तालुक्यातील वडनेर शिवर येथील ताहाराबाद रस्त्यावर सोमवारी पहाटे एक भीषण घटना घडली. बिबट्याच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
वडनेर येथील गव्हाणे वस्तीवरील शेतकरी शोभाचंद सीताराम गव्हाणे (वय ५५) हे सोमवारी, १० मार्च रोजी पहाटे शेतातील मका पिकाला पाणी देण्यासाठी गेले होते. त्या वेळी दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. या भीषण हल्ल्यात गव्हाणे यांचा जागीच मृत्यू झाला.
शोभाचंद गव्हाणे हे अपेक्षित वेळेत घरी न परतल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी शेतात जाऊन पाहणी केली असता त्यांचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आला. ही बातमी परिसरात पसरताच ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.
या घटनेची माहिती मिळताच राहुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय ठेगे आणि वनक्षेत्रपाल युवराज पाचारणे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी मृतदेहाचा पंचनामा करून तो शवविच्छेदनासाठी राहुरी ग्रामीण रुग्णालयात पाठवला. या घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
या घटनेनंतर माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी ग्रामीण रुग्णालयात जाऊन वनविभागाच्या दुर्लक्षित भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. तालुक्यात बिबट्यांच्या हल्ल्यांमध्ये वाढ होत असून वनविभाग यावर उपाययोजना करण्यात अपयशी ठरत असल्याचा आरोप त्यांनी केला. जिल्हा वनाधिकारी घटनास्थळी आल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली.
या घटनेनंतर वडनेर आणि आसपासच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. नागरिकांनी वनविभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. तालुक्यात बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यांमुळे शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये प्रचंड असुरक्षितता निर्माण झाली आहे.
वनविभागाने त्वरित उपाययोजना करून बिबट्यांच्या संख्येवर नियंत्रण आणावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. रात्रीच्या वेळी आणि पहाटे शेतात जाणे धोकादायक ठरत असल्याने लोकांनी अधिक काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रशासनानेही तातडीने या परिस्थितीवर तोडगा काढावा, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.