Thursday, September 19, 2024
Homeनगरबिबट्याच्या हल्ल्यात चार शेळ्या ठार

बिबट्याच्या हल्ल्यात चार शेळ्या ठार

भरदिवसा घडली घटना

तळेगाव दिघे |वार्ताहर| Talegav Dighe

- Advertisement -

सर्वत्र बिबट्याच्या हल्ल्याच्या (Leopard Attack) घटना ताज्या असतानाच संगमनेर (Sangamner) तालुक्यातील काकडवाडी शिवारात कासार वस्ती येथे भरदिवसा बिबट्याने शेळ्यांवर हल्ला करण्याची घटना घडली. या हल्ल्यात चार शेळ्या ठार (Goats Death) झाल्या, तर एक शेळी गंभीर जखमी झाली आहे. मंगळवारी (दि. 3 सप्टेंबर) दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. बिबट्याच्या हल्ल्याच्या या घटनेने शेतकरी वर्गात भीतीदायक वातावरण पसरले आहे.

काकडवाडी शिवारात नामदेव काशिनाथ ढवळे यांची वस्ती आहे. मंगळवारी त्यांच्या मालकीच्या पाच शेळ्या घरासमोर बांधलेल्या होत्या. दरम्यान नामदेव ढवळे हे चिंचोली गुरव येथे दवाखान्यात गेले होते. याच दरम्यान दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास बिबट्याने घरासमोर बांधलेल्या शेळ्यांवर हल्ला (Goats Attack) केला. या हल्ल्यत चार शेळ्या जागी ठार झाल्या, तर एक शेळी जखमी (Goats Injured) झाली. पाचव्या शेळीवर बिबट्या हल्ला करीत असतानाच नामदेव ढवळे हे घराकडे परतले. बिबट्या शेळ्यांवर हल्ला करीत असल्याचे बघताच त्यांनी आरडाओरडा केला. त्यामुळे बिबट्याने धूम ठोकली, त्यामुळे एक शेळी (Goats) बचावली.

ग्रामस्थांनी या घटनेची माहिती वन विभागाच्या (Forest Department) अधिकार्‍यांना दिली. त्यानंतर वनरक्षक डी. आर. कडनर व वन कर्मचारी बबन गायकवाड यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. याप्रसंगी प्रभारी सरपंच जनार्दन कासार, सुनील कासार सहित ग्रामस्थ उपस्थित होते. बिबट्याच्या हल्ल्यत चार शेळ्या दगावल्याने नामदेव ढवळे यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांना वन विभागाने तातडीने नुकसान भरपाई द्यावी व बिबट्यास पकडण्यासाठी सदर परिसरात तातडीने पिंजरा लावावा, अशी मागणी प्रभारी सरपंच कासार व सुनील कासार यांसह ग्रामस्थांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या