
लोणी । वार्ताहर
लोणी येथील कुरकुटे वस्ती शिवारातील शृंखला हॉस्टेलच्या पाठीमागे रविवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास काळीज थरथरणारी एक घटना घडली. शेतात पाणी भरत असताना अवघ्या २७ वर्षांच्या तरुणावर बिबट्याने अचानक जीवघेणा हल्ला केला.
स्वतः च्या डोळ्यादेखत पतीवर बिबट्याने मारलेली झडप आणि त्यानंतर प्राणांची बाजी लावून बिबट्याशी दिलेली थरारक झुंज पाहून उपस्थित पत्नीच्या पायाखालची जमीनच सरकली. रविंद्र रावसाहेब शिंदे (वय २७) असे या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून या घटनेने संपूर्ण परिसरात दहशतीचे सावट पसरले आहे.
रवींद्र शिंदे हे संतोष लक्ष्मण कुरकुटे यांच्या शेतात नेहमीप्रमाणे पाणी भरण्याचे काम करत होते. यावेळी त्यांची पत्नीही शेतात सोबत होती. काम सुरू असतानाच अचानक झुडपांमधून आलेल्या बिबट्याने थेट रविंद्र यांच्यावर झडप घातली. अनपेक्षितपणे झालेल्या या हल्ल्यामुळे क्षणाधार्त धांदल उडाली, मात्र रविंद्र यांनी अत्यंत प्रसंगावधान राखत बिबट्यापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी प्राणांतिक झुंज दिली. बिबट्याच्या या प्राणघातक हल्ल्यात रविंद्र गंभीर जखमी झाले आहेत.
घटना घडताच आसपासच्या नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मानद वन्यजीव रक्षक विकास म्हस्के, लोणी ग्रामपंचायत सदस्य प्रवीण विखे आणि संदीप गोसावी यांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून मदतकार्य सुरू केले. जखमी रविंद्र शिंदे यांना तातडीने प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या रुग्णालयात व सरकारी दवाखाना लोणी येथे प्राथमिक उपचारासाठी नेण्यात आले. मात्र दुखापत गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नगर येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले असून तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, या परिसरात एक मादी बिबट्या आपल्या काही पिलांसह फिरत असल्याची माहिती समोर आली आहे. आपल्या बछड्याच्या व अधिवासाच्या सुरक्षेसाठीच या मादी बिबट्याने हल्ला केला असण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे शृंखला हॉस्टेल परिसर, कुरकुटे वस्ती, लोणी-हसनापूर शिवार आणि लगतच्या शेतवस्त्यांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे. शेतकरी, महिला, लहान मुले आणि पशुधनाच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून वनविभागाने तातडीने या परिसरात पाहणी करून बिबट्याला जेरबंद करण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.




