दहिवड / मनोज वैद्य Dahivad
देवळा तालुक्यातील दहिवड येथील लवखाड मळा परिसरात मागील काही दिवसांपासून शेतकऱ्यांच्या पशुधन ठार करणारा बिबट्या आज दिनांक 28 जुलै रोजी रात्री वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात कैद झाला असून शेतकऱ्यांच्या वतीने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार देवळा तालुक्यातील दहिवड व उमराणे या गावांच्या सरहद्दीवर असलेल्या लवखाड मळा परिसरात मागील काही दिवसांपासून बिबट्याने दहशत माजवली होती. सदर बिबट्याने शेतकऱ्यांच्या बकऱ्या, पाळीव कुत्री तसेच गोधनावर हल्ला चढवत त्यांना ठार केले होते. बिबट्याचा बंदोबस्त व्हावा अशी मागणी स्थानिक शेतकरी करीत होते.
त्या अनुषंगाने देवळा येथील वनपरिक्षेत्राधिकारी संतोष जाधव, वनपाल देविदास चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक गंगाधर पवार, विजय पगार, नामदेव ठाकरे व वन कर्मचाऱ्यांच्या टीमने बिबट्याला पकडण्यासाठी दहिवड येथील शेतकरी तुकाराम दाजीबा पवार यांच्या शेत गट नंबर 196 मध्ये पिंजरा लावला होता, सदर पिंजऱ्यात आज दिनांक 28 जुलै रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास बिबट्या कैद झाला असून शेतकरी वर्गात समाधान व्यक्त करण्यात येत आहे.




