Saturday, May 4, 2024
Homeनाशिकआडगावला बिबट्याचा मृत्यू

आडगावला बिबट्याचा मृत्यू

नाशिक | Nashik

शहरातील आडगाव येथील प्रभाकर माळोदे यांच्या गट नंबर ११९९ मधील शेतात साेमवारी सकाळी एक बिबट्या मृतावस्थेत आढळून आला.

- Advertisement -

दरम्यान, वनविभागाने बिबट्याचे शवविच्छेदन केले असता, अंतर्गत रक्तस्रावाने व संसर्गाने त्याचा मृत्यू झाल्याच प्राथमिक अहवाल प्राप्त झाला आहे. मृत्यू झालेला बिबट्या सात वर्षांचा असल्याचे वनविभागाने सांगितले आहे.

आडगाव हा शेतमळ्यांचा परीसर असून या भागात यापूर्वी अनेकदा बिबटे आढळून आले आहेत. यातील काही बिबटे जिवंत पकडले गेले असून काहींचा नैसर्गिक मृत्यूही झाला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून नाशिक जिल्ह्यात बिबट्याचा आधिवास वाढत असून त्यांच्याकडून मानवावर हल्ले झाले आहेत.

आत्तापर्यंत ६ पेक्षा आधिक लाेकांचा मृत्यू बिबट्यांच्या हल्ल्यात झाला आहे. बिबट्यांची संख्या, आधिवास व हल्ल्याच्या सर्वात जास्त घटनांची नाेंदही नाशिक जिल्ह्यात झाली आहे.

या बिबट्याचा मृत्यू नैसर्गिक कारणामुळे झाल्याचा प्राथमिक अंदाज वनविभागाने वर्तविला असला तरी ठोस कारणाच्या निदानाकरीता शवविच्छेदनानंतर ‘व्हिसेरा’ मेरीच्या न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेला पाठविण्यात आला आहे. प्रभाकर माळोदे यांच्या द्राक्षबागेत एक मोठा बिबट्या मृतावस्थेत दिसून आल्याने शेतकरी घाबरले. त्यांनी तत्काळ वनविभागाला माहिती दिली.

घटनेची माहिती मिळताच वनपाल अनिल अहिरराव, वनरक्षक उत्तम पाटील, राजेंद्र ठाकरे घटनास्थळी दाखल झाले. पथकाने तत्काळ मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी मृतदेह अशोकस्तंभावरील दवाखान्यात हलविला.

पशुधनविकास अधिकारी डॉ. वैशाली थोरात यांनी मृतदेहाचे शवविच्छेदन केले असता बिबट्याच्या शरिरात अंतर्गत रक्तस्त्राव, विषबाधा तसेच फफ्फुसाचा मोठा संसर्ग झाल्याचेही निष्पन्न झाले आहे.

वन्यजीव संरक्षण अधिनियम अनुसुची-१मधील संरक्षित वन्यप्राणी असल्यामुळे बिबट्याच्या मृत्यूचे ठोस कारण नमूद करणे गरजेचे आहे. प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतर ते स्पष्ट होईल, असे वनक्षेत्रपाल विवेक भदाणे यांनी स्पष्ट केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या