नांदुरमध्यमेश्वर। वार्ताहर Nandurmadhyameshwar
येथील जनार्दन स्वामी नगर परिसरात बिबट्याचे दर्शन झाल्याने परिसरातील शेतकर्यांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. नांदुरमध्यमेश्वर माजी सरपंच शांताराम दाते यांच्या मक्याच्या शेतातून कारल्याच्या बागेत बिबट्याला जातांना मजुरांनी बघितल्याने शेतातील काम सोडून मजुरांनी पळ काढला.
या परिसरात जवळपास सात ते आठ बिबटे फिरत असल्याने त्यात काही माद्यांनी पिलांना जन्म दिला असल्याने रात्री-बेरात्री फिरणारे बिबटे दिवसाही शेतातून फिरत असल्याने आधीच मजुरांची वणवा त्यात बिबट्याची दहशत कायम असल्याने शेतात मजुर काम करायला तयार नाही.
शेतीचा हंगाम सुरु असल्याने मका, सोयाबीन, औषध फवारणी किंवा निंदण्याची मशागत तर ऊसाला रसवंतीच्या तोडी व चार्यासाठी मागणी असल्याने ऊसाच्या शेतात जायचे कसे हा प्रश्न निर्माण झाल्याने बिबट्याच्या बंदोबस्तासाठी वनविभागाने तत्काळ या परिसरात पिंजरा लावण्याची मागणी शांताराम दाते यांचेसह परिसरातील शेतकर्यांनी केली आहे.