Friday, September 20, 2024
Homeनाशिकलोहणेरला डोण शिवारात बिबट्याचा धुमाकूळ

लोहणेरला डोण शिवारात बिबट्याचा धुमाकूळ

- Advertisement -

लोहणेर । वार्ताहर Lohner

लोहोणेर येथील डोण शिवारात पाचटाच्या झापात बांधलेल्या बकरीवर बिबट्याने हल्ला चढवित गंभीररित्या जखमी केले. यावेळी गाईंसह इतर जनावरांनी जोरात हंबरडा फोडल्याने जागे झालेल्या शेतकरी कुटूंबीयास बिबट्याने बकरीस पकडले असल्याचे निदर्शनास येताच त्यांनी आरडाओरड केल्याने घाबरलेल्या बिबट्याने पलायन केले.

दरम्यान, डोण शिवारात काही दिवसापासून धुमाकुळ घालत असून अनेक पाळीव जनावरांचा त्याने फडशा पाडला आहे. या बिबट्याचा वनविभागाने त्वरीत बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकर्‍यांसह ग्रामस्थांतर्फे करण्यात आली आहे.

शेतकरी बाजीराव आनंदा पवार यांच्या शेतात काल मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याने हल्ला चढवत बकरीस गंभीररित्या जखमी केले आहे. पाचटाच्या झापमध्ये दोन गायी व बकर्‍या त्यांनी बांधलेल्या होत्या. बिबट्याने हल्ला करताच गायी व इतर बकर्‍या जोरात ओरडल्याने हा प्रकार लक्षात आला. या संदर्भात किशोर देशमुख यांनी पोलीस पाटील अरुण उशीरे यांना माहिती दिली.

वनविभागाच्या कर्मचार्‍यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. लगतच्या शेतात पायाचे ठसे आढळून आल्याने हल्ला बिबट्यानेच केला असल्याचे निष्पन्न झाले. परीसरात नियमित बिबट्याचे दर्शन होत असल्याने शेतकर्‍यांमध्ये दहशत निर्माण झाली असून यामुळे रात्रीच्या अंधारात पिकांना पाणी देणे मुश्कील झाले आहे. वन विभागाने बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी वर्गाने केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या