कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav
तालुक्यातील जवळके नजीक असलेल्या धोंडेवाडी येथील शेतकर्याच्या शेतात तीन बिबटे रात्रीच्या सुमारास आढळून आले आहेत.त्यामुळे जवळके आणि परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
बिबटे मनुष्यवस्तीजवळ रहाणे जास्त पसंत करतात व तेथील कुत्री,पाळीव जनावरे हे त्यांचे आवडते भक्ष्य आहे. यामुळेच दरवर्षी बिबट्या मनुष्यवस्तीत घुसण्याच्या शेकडो घटना घडतात. बिबट्या हा मुख्यत्वे जंगलातच राहणे पसंत करतो. मात्र अलीकडील काळात त्याचे खाद्य दुर्मिळ होत असल्याने तो मनुष्य वस्तीत घुसताना आढळत आहे. रांजणगाव देशमुख ते देर्डे या रस्त्यावर काल रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास किरण प्रल्हाद जवरे हा आपल्या ट्रॅक्टरवरून वस्तीवर जात असताना नामदेव किसन थोरात यांच्या शेताजवळ त्यास दोन बिबटे आडवे गेले आहेत.
त्यामुळे त्याची घबराट उडाली होती. मात्र त्याने ट्रॅक्टर उभा करून भ्रमणध्वनीच्या सहाय्याने अन्य शेतकर्यांना मदतीस बोलावले होते. त्यावेळी काही वेळाने सदर बिबट्या मार्गस्थ झाला आहे. त्यानंतर काही शेतकर्यांना मदतीस घेऊन त्यांनी ट्रॅक्टरच्या सहाय्याने पाठलाग केला असता त्या ठिकाणी थोड्या अंतरावर आणखी एक बिबट्या आढळून आला आहे. त्यामुळे त्यांची संख्या तीन झाली आहे. त्यांनी त्यानंतर त्यांना विविध आवाजाच्या साहाय्याने पिटाळून लावले आहे. मात्र या घटनेने जवळके,धोंडेवाडी, बहादरपूर, बहादराबाद, शहापूर, वेस-सोयगाव, सायाळे आदी परिसरातील शेतकर्यांत भीतीचे वातावरण पसरले आहे. तालुक्यातील वन विभागाने सदर बिबट्याचा बंदोबस्त करावा,अशी मागणी या परिसरातील शेतकर्यांनी केली आहे.