Saturday, May 4, 2024
Homeनाशिकतब्बल चौदा दिवसांनी बिबट्याची मादी अडकली पिंजऱ्यात

तब्बल चौदा दिवसांनी बिबट्याची मादी अडकली पिंजऱ्यात

घोटी । Ghoti

बिबट्याचे संचारक्षेत्र असलेल्या इगतपुरी तालुक्यातील पूर्व भागात सध्या सर्वत्र बिबट्याचा वावर असल्याचे दिसत आहे. गेल्या १५ दिवसापूर्वी खेडभैरव येथील देवाची वाडी शिवारात एका बालिकेवर व त्यानंतर घरी जाणाऱ्या इसमावर बिबट्याने हल्ला करून जखमी केले होते.

- Advertisement -

या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी तब्बल चार पिंजरे लावण्यात आले होते. मात्र बिबट्या पिंजऱ्याकडे फिरकत नव्हता. अखेर आज तब्बल १५ दिवसांनी आज पहाटेच्या सुमारास मादी बिबट्या तीन नंबरच्या पिंजऱ्यात जेरबंद झाली.

आज पहाटे बिबट्याची मादी जेरबंद झाल्याचे समजताच वनविभागाला काहीसा दिलासा मिळाला असला तरी अद्यापही या परिसरात आणखी एखादा बिबट्या वावरत असावा अशी शक्यता परिसरातील नागरिक व्यक्त करीत भीतीच्या दडपणाखालीच वावरत असल्याचे दिसत आहे.

पंधरा दिवसापूर्वी भैरवनाथ मंदिराजवळच्या एका वाडीतील बालिका आपल्या आजीसमवेत घरी जात असताना सायंकाळी सात वाजेच्या सुमारास बिबट्याने झडप घालून बालिकेस गंभीर जखमी केले होते. त्यामुळे बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने प्रारंभी दोन पिंजरे लावले होते. मात्र बिबट्या फिरकत नसल्याने वनविभाग चिंतेत असताना आठ दिवसांनी याच परिसरात पुन्हा एका ४५ वर्षीय इसमावर बिबट्याने झडप घालून त्यालाही गंभीर जखमी केले होते.

या घटनेनंतर मात्र वनविभागाचे तालुका परिक्षेत्र अधिकारी रमेश ढोमसे यांच्या मार्गदर्शनाखाली आणखी दोन असे चार पिंजरे लावून बिबट्याला जेरबंद करण्याची मोहीम आखली होती, मात्र तरीही बिबट्या पिंजऱ्याकडे हुलकावणी देत असल्याने वनविभागही हतबल ठरला होता. अखेर आज पहाटेच्या सुमारास कोंबड्यांची शिकार करण्याचा मोहात बिबट्याची मादी पिंजऱ्यात अडकली.

बिबटया पिंजऱ्यात अडकल्याची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी ढोमसे, वनपाल दत्तू ढोन्नर, खाडे, श्रीमती पाठक आदींनी घटनास्थळी धाव घेऊन सुटकेचा निःश्वास सोडला.

- Advertisment -

ताज्या बातम्या