Saturday, May 4, 2024
Homeनाशिकसातासमुद्रापार माय मराठीचे धडे

सातासमुद्रापार माय मराठीचे धडे

नाशिक ।

‘मराठी असे आमुची मायबोली’ या ब्रीदाला स्मरून अभिजात संस्कृतीचा वारसा लाभलेल्या मराठी भाषेच्या प्रचार – प्रसारासाठी मानवधन सामाजिक शैक्षणिक विकास संस्थेने पुढाकार घेतला आहे.

- Advertisement -

मराठी भाषेच्या संवर्धनासाठी मानवधन सामाजिक शैक्षणिक विकास संस्थेचे अध्यक्ष प्रकाश कोल्हे यांच्या संकल्पनेतून, ‘मानवधन ग्लोबल लँग्वेज स्कूल’ सुरू करण्यात आली असून, याद्वारे जे नागरिक परदेशात स्थायिक झाले आहेत, त्यांना मराठी भाषा शिकविली जाणार आहे.

मराठी भाषेला संस्कृती आणि परंपरेचा अभिजात वारसा लाभला आहे. मराठी साहित्य व कला यांचा दर्जात्मक ठसा अवघ्या साहित्य विश्वात उमटला आहे. राजभाषेचा दर्जा लाभलेल्या मराठीचा जागतिक स्तरावर गौरव व्हावा, या व्यापक दृष्टीकोनातून एक सक्षम पाऊल उचलत कोल्हे यांनी ‘मानवधन ग्लोबल लँग्वेज स्कूल’ ची निर्मिती केली आहे. विशेष बाब म्हणजे स्कूल सुरू होताच नेदरलैंड व अमेरिका येथून प्रवेश देखील झाले आहेत.

नोकरी-व्यवसायानिमित्त लाखो मराठी भाषिक लोक वेगवेगळ्या देशांत स्थायिक झाले आहेत. तसेच फॉरेन लैंग्वेज म्हणून मराठी भाषा शिकणे हाही पर्याय अनेकांना निवडावासा वाटतो. जे लोक परदेशात स्थायिक आहेत; परंतु पुन्हा मायदेशी परतल्यानंतर त्यांच्या मुलांच्या शिक्षणात बाधा येऊ नये.

इथल्या भाषेशी त्यांना सहज समरूप होता यावे. त्याचप्रमाणे नात्यांमध्ये भाषेचा अडसर येऊन विकल्प येऊ नये, या उद्देशाने या स्कूलची निर्मिती करण्यात आलेली आहे. केवळ विदेशात स्थायिक झालेल्या मराठी लोकांनाच नव्हे , तर जगातील कोणत्याही देशातील आणि कोणत्याही भाषिक लोकांना या स्कूलच्या माध्यमातून मराठी शिकता येणार आहे.

महत्त्वाचे म्हणजे नवीन पिढीला मराठी भाषेचे ज्ञान नाही. त्यामुळे मराठी भाषा लोप पावत चालली असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. या पार्श्वभूमीवर मराठी भाषेचे संवर्धन व्हावे व नव्या पिढीला आपल्या संस्कृतीचा आणि भाषेचा गोडवा चाखता यावा.

मराठी भाषा आत्मसात करता यावी, या उद्देशाने मानवधन संस्थेतर्फे हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. संस्थेतर्फे ऑनलाईन स्वरूपात मराठी भाषेचे धडे दिले जाणार असून, या उपक्रमामुळे ज्यांना मराठी भाषा येत नाही त्यांना मराठी भाषा बोलण्यास मदत होऊ शकेल.

या उपक्रमाविषयी अधिक माहिती संस्थेच्या www.manavdhan.in संकेत स्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या