होळी, रंगपंचमी म्हणजे रंगांची उधळण. आपल्या माणसांसोबत वेळ घालवण्याची संधी आणि नवी उर्जा सण देत असतात. यंदा कोरोनाचे सावट दूर होऊन चित्रपटगृह, नाट्यगृह 100 टक्के क्षमतेने सुरू झाली आहेत. खरे तर यामुळे आम्हा कलाकारांच्या आयुष्यात नव्याने रंग भरले जाणार आहेत.
शोले’ चित्रपटात जया बच्चन यांच्या तोंडी एक वाक्य आहे. ‘ये रंग ना होते तो कैसी बेरंग होती ये दुनिया’. मला वाटतं की हे अगदी खरे आहे. कारण रंगांशिवाय आपण आयुष्याचा विचारही करू शकत नाही. काळ्या, पांढर्या किंवा कोणत्याही एका रंगांमध्ये आपले आयुष्य सामावू शकत नाही. आता माणसाच्या स्वभावाचेच घ्या. मानवी स्वभावाच्या अनेक छटा आहेत. या सगळ्या छटा आपल्याला समजून घ्याव्या लागतात, जाणून घ्याव्या लागतात. मानवी मनाचे अनेकविध कंगोरे म्हणजेच रंग समजून घेतले तर आपण त्या एखाद्या व्यक्तीच्या अधिक जवळ जाऊ शकतो. रंगांमुळे आपल्याला वेगळी ऊर्जा मिळत असते. एखादा रंग बघितल्यावर आपले मन मोहरून जाते. रंगांमुळे आपल्या जाणिवा समृद्ध होत असतात. त्यामुळे रंगांशिवाय आयुष्य अर्थहीन वाटू लागते.
निसर्गाने आपल्यावर मुक्त हस्ताने रंगांची उधळण केली आहे. दैनंदिन आयुष्य जगताना आपले या रंगांकडे पटकन लक्ष जात नाही. पण या रंगांमध्येही अनेक गूढ अर्थ दडलेले असतात. हे अर्थ उलगडून पाहण्यातली मजा काही वेगळीच असते. आपल्या डोक्यावरच्या आकाशाचे रंग सातत्याने बदलत असतात. पहाटे, सूर्य उगवताना, मावळताना आकाशाचे निरीक्षण केले तर निसर्ग हा किती उत्तम कलाकार आहे, हे आपल्या लक्षात येते. निळ्याशार आकाशात भरारी घ्यावीशी वाटते. रात्रीच्या काळ्याकुट्ट आकाशात चमचमणारे तारे एक वेगळीच रंगसंगती साधत असतात. रस्त्यात फुललेली वेगवेगळ्या रंगांची फुले, हिरव्या रंगाच्या विविध छटा दाखवणारी झाडे, रस्त्यावर पडलेला पालापाचोळ्याचा खच, रंगीबेरंगी फळे असे बरेच काही आपल्या आजूबाजूला असते. या सगळ्या रंगांचा आस्वाद घ्यायला हवा. धावपळीच्या, धकाधकीच्या आयुष्यात क्षणभर थांबून निसर्गातले हे रंग अनुभवायला हवेत. आपले आयुष्य खरेच किती रंगीबेरंगी आहे, याची जाणीव करून घ्यायला हवी. रंगांची उधळण करणारा रंगपंचमीचा सण आपल्याला हाच संदेश देत असतो.
आपल्याकडचे सगळे सण खूप अनोखे आहेत. सर्वांनी एकत्र येणे हा सणांचा मूळ गाभा आहे. सणांच्या निमित्ताने माणसा-माणसातले बंध घट्ट होत असतात. होळी हा सर्वसमावेशक आणि संपूर्ण देशभरात साजरा होणारा सण आहे. त्यामुळे सगळेजण राज्यांच्या सीमा विसरून एकत्र येताना दिसतात. होळीला होलिकादहन केले जाते. या होळीत सगळ्या वाईट, नकारात्मक गोष्टींचे दहन करून चांगले, सकारात्मक आहे ते आपल्याकडे ठेवायचे अशी प्रथा आहे. प्रत्येक वर्षी होळी आपल्याला हेच सांगत असते. आयुष्यात घडलेले कटू प्रसंग मागे सोडून नव्याने सुरुवात करण्याची उमेद होळीच्या निमित्ताने मिळत असते. होळी या सणाचे आमच्या आयुष्यात नेहमीच महत्त्व राहिले आहे. होळीच्या निमित्ताने कौटुंबिक स्नेहसंमेलने व्हायची. आम्ही चौघे म्हणजे आई-बाबा आणि आम्ही दोघी बहिणी होळीला बाहेर कुठे तरी फिरायला जायचो. आम्ही चौघेजण मिळून कुठेतरी बाहेर गेलो आहोत आणि खूप धमाल करत आहोत, असेच चित्र होळीच्या निमित्ताने माझ्या डोळ्यांपुढे उभे राहते. आमच्या बिल्डिंगमध्ये होळी असायची. त्या निमित्ताने बिल्डिंगमधली सगळी माणसे एकत्र यायची आणि आम्ही खूप धमाल करायचो. मग दुसर्या दिवशी आम्ही बाहेर फिरायला जायचो.
आपल्याकडचे सण आणि सणाच्या निमित्ताने केले जाणारे खाद्यपदार्थ यांचा प्रत्येक ऋतूशी आणि ऋतूबदलाशी संबंध असतो. कोणत्या ऋतूत काय खायला हवे, कोणत्या पद्धतीची जीवनशैली अंगिकारायला हवी, या सगळ्याचा सर्वांगीण विचार करून सणांची रचना करण्यात आली आहे. आपले सण बदलत्या हवामानाला अनुसरून असतात आणि सणांच्या निमित्ताने हा बदल साजरा होत असतो. आयुष्यातले बदल आनंदाने स्वीकारण्याचा, साजरा करण्याचा धडाच हे सण देत असतात. होळीला वसंताचे आगमन होत असते. हा बहराचा काळ असतो. त्यातच पुढे येणार्या कडक उन्हाळ्याचीही तयारी करायची असते. आपल्या माणसांसोबत वेळ घालवणे किती आवश्यक आहे, हे आपल्याला गेल्या दोन कोरोनामय वर्षांनी शिकवले आहे. शिवाय सध्याच्या धकाधकीच्या आयुष्यात आपल्या माणसांसोबत घालवलेले सुखाचे चार क्षण आपल्याला ताजेतवाने करून जातात आणि मग आपण पुढच्या आव्हानांना सामोरे जायला सज्ज होतो.
मला होळी, रंगपंचमीचा सण खूप आवडतो. मी ही मुक्तहस्ताने रंगांची उधळण करत असते. अगदी जवळच्या, खास लोकांसोबत, जवळच्या मित्रमैत्रिणींसोबत मी रंग खेळते. मला सणांमध्ये साधेपणा जपायला आवडतो. आमच्या कुटुंबात सगळे सण साधेपणाने पण उत्साहात साजरे होतात. खूप धांगडधिंगा होत नाही. आजही आमच्याकडे हा साधेपणा जपला जातो. लग्नानंतर माझ्या नवर्याच्या मित्र-मैत्रिणींसोबत (जे आता माझेही चांगले मित्रमैत्रिणी झाले आहेत) मी हा सण साजरा करते. होळीच्या निमित्ताने आम्ही एकत्र येतो, मजा करतो. कोणीही सहसा हा दिवस चुकवत नाही. कारण या निमित्ताने एकमेकांना भेटता येते. प्रत्येकजण आपल्या आयुष्यात व्यस्त असल्यामुळे नियमित भेटणे शक्य होत नाही. मग होळीचा मुहूर्त साधून आम्ही एकत्र येतो, बाहेर जेवायला जातो. आमच्या ग्रुपमधल्या बहुतेकांची मुले लहान आहेत. तीही आमच्यासोबत असतात. हे आमचे कुटुंबाबाहेरचे कुटुंब आहे. त्यांच्यासोबत वेळ घालवण्याची संधी मिळत असल्यामुळेही मला होळी खूप आवडते.
चित्रपटांमध्ये होळीला विशेष स्थान असल्याचे आपण बघतो. अनेक चित्रपटांमध्ये होळीचा माहोल तयार केला जातो. होळीशी संबंधित अनेक गाणी आहेत. होळीला ही गाणी वाजत असतात. रंगांचा सण असल्यामुळे होळीचं दृश्य रुप फार छान असतं आणि चित्रपट हे दृश्य माध्यम असल्यामुळे इथली रंगांची उधळण डोळ्यांना आकर्षित करते. होळीच्या निमित्ताने आसपासचं वातावरण रंगीत झालेले असते. नात्यांमध्ये मोकळेपणा येतो. या निमित्ताने वातावरण हलकं होतं. गंमत फारशी कोणी मनावर घेत नाही. ‘बुरा ना मानो होली है’ असे म्हणत मजा, मस्करी चालते. त्यामुळे चित्रपटसृष्टीला अशा सणाची भुरळ पडली नसती तरंच नवल.
यंदाची होळी प्रत्येकासाठीच खास असणार आहे. गेली दोन वर्षं आपल्या प्रत्येक सणावर कोरोनाचे सावट होते. या सावटाखालीच आपण सण साजरे केले. पण यंदा काहीसे मोकळे वातावरण बघायला मिळत आहे. अर्थात धोका पूर्णपणे टळलेला आहे, असं म्हणता येणार नाही. त्यामुळे काळजी घ्यावीच लागणार आहे. पण कोरोनाचा घसरता आलेख बघून दिलासा मिळत आहे. होळीच्या निमित्ताने सकारात्मक वातावरण पहायला मिळत आहे. आता सगळ्यांनीच त्या निराशेतून बाहेर पडणे आवश्यक आहे. त्या वाईट आठवणींना तिलांजली देऊन आयुष्याला नवी उभारी देणेही गरजेचे आहे आणि लोक आता या नैराश्यातून बाहेर पडत आहेत. यंदाच्या होळीत या नैराश्याचं दहन करायला हवे. या कोरोनारुपी राक्षसाचे दहन व्हावे, अशी कामना आपण गेली दोन वर्षं होळीच्या निमित्ताने करत आहोत. आता हे होताना दिसत आहे. त्यामुळे कोरोनाचे हे सावट लवकरात लवकर दूर व्हावे आणि सगळे पुन्हा सर्वसामान्य व्हावे, हीच अपेक्षा प्रत्येकजण व्यक्त करताना दिसत आहे. गेली दोन वर्षं खूप दु:खद वातावरण होते. अनेकांना आपले घर चालवण्यासाठी बरेच कष्ट पडले. मात्र आता ही नकारात्मकता दूर होत आहे.