पालकांनी त्यांची स्वप्ने मुलांवर लादू नयेत. त्यांच्या कल्पनाशक्तीला वाव द्यावा. त्यातून जाणीवा विकसित होतील. मुले त्यांच्या कलाने ज्ञान संपादन करतील. मुलांच्या स्वप्नांना पालकांनी पंख फुटू दिले तर मुले कमाल घडवू शकतात. केंद्र सरकारच्या अटल इनोव्हेशन मिशन उपक्रमात सहभागी लाखो विद्यार्थ्यांनी अनोखे प्रकल्प सादर केले. देशातील ४०० शाळांच्या विद्यार्थ्यांचे प्रकल्प निवडले गेले. त्यात अमरावतीच्या एका शाळेचा समावेश आहे. त्या शाळेतील विद्यार्थ्यांचे संशोधन रेल्वेशी संबंधित आहे.
रेल्वे स्थानकांवरील अपघात कसे रोखता येतील यासंदर्भात नाविन्यपूर्ण संशोधन केले आहे. त्याचा वापर करून भविष्यात रेल्वे स्थानकांवरील रेल्वे अपघात रोखता येतील असा विश्वास विद्यार्थ्यांनी व्यक्त केला. रेल्वेस्थानकांवर होणारे अपघात हा सामाजिक चिंतेचा विषय आहे. तो शाळकरी मुलांना जाणवला हे विशेष. मुले म्हणजे ऊर्जेचे प्रचंड मोठे भांडार असते. तिला विधायक वळण लावायला हवे. तसे झाले तर मुलांची विचारशक्ती विकसित होते. त्यांना प्रश्न पडतात. शिक्षकांच्या मदतीने त्याची उत्तरे शोधण्याची सवय लागते. सामाजिक बांधिलकी, माणुसकी, मोठ्यांप्रती आदर अशी अनेक मूल्ये कृतीतून रुजतात. ती त्यांच्या आयुष्यावर कायमचा ठसा उमटवतात. अशा युवांना सामाजिक समस्या जाणवू शकतात. अस्वस्थ करू शकतात. त्यातूनच त्यावर उपाय शोधण्याची प्रेरणा मिळू शकते. विज्ञान प्रदर्शनात दाखल होणारे प्रयोग हे त्याचे चपखल उदाहरण ठरावे. इस्लामपूरच्या विद्यार्थ्यांना बैलांचे कष्ट जाणवले. ते कमी करणारी बैलगाडी त्यांनी तयार केली. काही मुलांनी हेल्मेट घातल्याशिवाय दुचाकी सुरु होणार नाही असे उपकरण बनवले.
अशा विविध उपक्रमांमध्ये सादर होणारे प्रयोग प्राथमिक स्तरावरचे असतात. त्यांचा व्यवहार्य उपयोगापर्यंतचा प्रवास अडथळ्यांचा असतो. तथापि विद्यार्थ्यांच्या सामाजिक जाणीवा त्यातून विकसित होतात ही सर्वात मोठी उपलब्धी ठरावी. मुलांच्या हक्कांसाठी कार्यरत संयुक्त राष्ट्रीय परिषदेत मुलांचे वेगवेगळे हक्क निश्चित करण्यात आले. त्याला १९६ देशांनी सहमती दिली आहे. त्यातही विश्रांती, खेळ, मनोरंजक गोष्टींमध्ये रमण्याचा हक्क अशा अनेक मुद्यांचा समावेश आहे. अर्थात मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षक आणि पालकांचे मनापासून सहकार्य अपरिहार्य आहे. मुलांचे खेळणे, प्रश्न विचारणे, रिकामा वेळ घालवणे, अवांतर वाचन, मनोरंजन यांची सर्वांगीण विकासातील महत्वाची भूमिका त्यांनी आधी समजावून घ्यायला हवी.
त्यासाठी प्रसंगी त्यांच्या स्वभावाला, अपेक्षा आणि आशांना मुरड घालावी लागू शकेल. मुलांनाही त्यांच्या वयानुसार अनेक गोष्टी कळू शकतात. त्यांनाही अनेक प्रकारचे ताण जाणवतात हे समजावून घ्यायला हवे. त्यांनाही जबाबदारी घ्यायला आवडते, स्वातंत्र्य आवडते हे पालकांच्याही लक्षात येईल. मुलांच्या सुदैवाने सुजाण पालकांची संख्या वाढत आहे. करोना काळाने अनेक उप्रक्रमशील शिक्षकांचा समाजाला परिचय करून दिला. त्यांची संख्या वाढायला हवी. ‘जे पेराल तेच उगवते’ हे याबाबतीत तंतोतंत लागू होऊ शकेल. मुलांच्या स्वप्नांना पंख फुटू देणेच योग्य ठरेल. त्यासाठी शिक्षण आणि पालकांची मानसिकता मात्र बदलावी लागेल.