Monday, November 25, 2024
Homeअग्रलेखत्यांना खेळू द्या!

त्यांना खेळू द्या!

मुलांच्या आणि ज्येष्ठांच्या आयुष्यातून मैदाने जवळपास हद्दपार झाली आहेत. प्युमा कंपनी आणि निल्सेन स्पोर्टस् या दोन संस्थांनी याच मुद्यावर एक सर्वेक्षण केले. त्या सर्वेक्षणातही हाच निष्कर्ष नमूद आहे. या दोन्ही वयोगटांची मैदानाशी नाते तुुटण्याची कारणे वेगळी असली तरी बहुसंख्य मुले आणि ज्येष्ठ कोणताही खेळ खेळत नाहीत हे वास्तव आहे. मुलांचे आयुष्य मोबाईलशी, शाळा-अभ्यास-क्लासेस अशा व्यस्त दिनक्रमाशी जखडले गेले आहे. काही मुलांची खेळायची इच्छा असली तरी पालकांचा दबाव आणि व्यस्त वेळापत्रकातून खेळण्यासाठी वेळ कसा काढणार हाच प्रश्न त्यांना सतावतो. बहुसंख्य मुले मोबाईलवरच खेळ खेळतात. बैठी जीवनशैली त्यांच्या अंगवळणी पडते. पालकांनाही त्यात काहीच गैर वाटत नाही. कारण आपली शिक्षणव्यवस्था गुणप्रधान आहे. मुलांना परीक्षेत मिळणारे गुण सर्वाधिक महत्वाचे मानले जातात. त्यामुळे लहानपणी घरात व अंगणात मनसोक्त खेळणारे मुल जसजसे मोठे होेते, वरच्या इयत्तांमध्ये शिकायला लागते तसतसे त्याचे खेळणे कमी होते. दहावीत गेल्यावर तर ते बंदच होते. खेळात कुठे करियर होते का, असा प्रश्न अनेक पालक विचारतात. मुलाने खेळण्यापेक्षा अभ्यास करावा हेच मुलांना सतत सुचवले जाते. मैदानावर खेळायला जाणे म्हणजे वेळ वाया घालवणे हीच अनेक पालकांची भुमिका असते. तद्वतच खेळ मोठ्यांसाठी नसतात असा भ्रम वर्षानुवर्षे जोपासला जातो. खेळ न खेळण्यासाठी ज्येष्ठ शारीरिक तक्रारींचा बागुलबुवा उभा करतात. ज्येष्ठ मैदानावर खेळायला लागले तर लोक नावे ठेवतील असाही बहाणा सांगितला जातो. तात्पर्य, मुले आणि ज्येष्ठ खेळत नाहीत हे वास्तव आहे. या दोन्ही वयोगटांच्या लोकांनी खेळावे यासाठी वर उल्लेखिलेल्या दोन्ही संस्थांनी पुढाकार घेतला आहे. ‘त्यांना खेळू द्या’ असा उपक्रम सुरु केला आहे. मेरी कोम आणि सुनिल छेत्री हे जगप्रसिद्ध खेळाडू या उपक्रमाचे क्रीडादूत आहेत. ते समाजात जागरुकता निर्माण करणार आहेत. आयुष्यातून खेळ वजा झाल्यामुळे मुले आणि ज्येष्ठ बरेच काही गमावतात. मुलांच्या विकासात खेळाची विशेष भुमिका आहे. खेळामुळे मुलांच्या सामाजिक विकासाचा पाया भक्कम होतो. मुले संघभावना शिकतात. त्यांच्यात खिलाडूवृत्ती विकसित होते. इतरांचे त्यांच्या पुढे जाणे मुले सहज स्वीकारायला शिकतात. परस्पर स्पर्धा कमी होते. मुलांमध्ये एकाग्रता वाढते. मुलांमधील उर्जेला सकारात्मक वाट मिळते. त्यांचे आरोग्य सुदृढ होते. या मुल्यसंस्कारांचे मोल अन्य कशाने होऊ शकेल का? खेळण्यामुळे ज्येष्ठांच्याही शारीरिक तक्रारी कमी होऊ शकतात. आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन सकारात्मक होऊ शकेल. परिस्थितीची स्वीकारार्हता वाढीस लागू शकेल. बाऊ करण्याची वृत्ती कमी होईल. हे सगळे फायदे लक्षात घेता मुलांनी आणि ज्येष्ठांनी खेळाशी पुन्हा एकदा जोडले जायला हवे. त्यांच्या वयोगटाला पेलवतील असे खेळ खेळायला हवेत. त्यासाठी संबंधित सर्वांची, विशेषत: पालकांची मानसिकता बदलायला हवी. खेळ मुलांमध्ये माणूसपण रुजवतात. मुलांना चांगला माणूस घडवण्यार्‍या खेळाला पालक शालेय अभ्यासाइतकेच किंबहुना चकांकणभर अधिकच महत्व देतील आणि क्रीडा संस्कृती रुजवण्याला सरकारही विशेष प्राधान्य देईल अशी अपेक्षा करावी का? 

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या