आज वसूबारस. आजपासून दिवाळी सणाला सुरुवात होते. करोना काळातील दोन वर्षे कोणतेही सण सार्वजनिकरित्या साजरे करता आले नव्हते. तो काळ सर्वांनीच विचित्र मानसिकतेत घालवला होता. करोनाची साथ आटोक्यात येताच सार्वजनिक वावरावरील निर्बंध तत्कालीन सरकारने हळूहळू संपुष्टात आणले होते. लोकही आतुरतेने सार्वजनिक सणांची वाट बघत होते. सरकारच्या काहीशा उदार धोरणामुळे सगळेच सार्वजनिक सण लोकांना उत्साहात आणि आनंदात साजरे करता येत आहेत. यंदाची दिवाळीही त्याला अपवाद नाही.
लोकांच्या मनातील उत्साहावर आणि बाजारातील वातावरणावर पावसाने पाणी फेरले असले तरी दिवाळीत पाऊस नक्कीच विश्रांती घेईल हाच आशावाद लोकांच्या मनात आहे. पाऊस पडण्याच्या वेळा लक्षात घेऊन लोकांनी खरेदीच्या वेळाही बदलल्या आहेत. एका बाजूला उत्साह आणि दुसर्या बाजूला निसर्गाच्या अवकृपेमुळे वाढती चिंता असे संमिश्र वातावरण आहे. त्यासोबतच आता सार्वजनिक आरोग्यासंदर्भात सावध करणार्या बातम्याही माध्यमात प्रसिद्ध होत आहेत. राज्य सरकारनेही करोनाचा संसर्ग पुन्हा वाढू शकेल असा इशारा नुकताच दिला आहे. वैद्यकीय तज्ञही बदलत्या परिस्थितीकडे सरकारचे आणि लोकांचे लक्ष वेधून घ्यायचा प्रयत्न करत आहेत.
करोनाची साथ संपली असेच लोकांना वाटत होते. तथापि करोना विषाणूने दोन नवे अवतार धारण केले असून या नव्या विषाणूंचे बारसे देखील करण्यात आले आहे. त्यांचा संसर्गाचा वेग अधिक आहे असे राज्याच्या आरोग्याधिकार्यांनी माध्यमांना सांगितले. दुर्धर व्याधी असणार्या आणि रोगप्रतिकारक क्षमता कमी असणारांना संसर्गाचा धोका जास्त असेल असेही त्यांनी बजावले आहे. राज्य सरकारनेही मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. करोनाच्या नव्या विषाणूचा संसर्ग झालेले 18 रुग्ण राज्यात आढळले आहेत. दरम्यान एका दिवसात 418 रुग्णांना करोनाचा संसर्ग झाल्याचे आरोग्य विभागाने माध्यमांना सांगितले. यंदा हंगामी पावसाचा काळही कमालीचा लांबला आहे. त्यामुळे साथरोगांचाही धोका आहे. डेंग्यू, मलेरिया आणि चिकनगुनियाची रुग्णसंख्या दिवसेदिवस वाढत आहे.
नाशिक शहरात डेंग्यूचा संसर्ग झालेल्या रुग्णसंख्येने कालपर्यंत चारशेचा आकडा ओलांडला होता अशा आशयाचे वृत्त माध्यमात प्रसिद्ध झाले आहे. ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्याच पंधरवड्यात डेंग्यूचे 75 रुग्ण नव्याने आढळले. या पार्श्वभूमीवर करोना लसीकरणाचा वेगही मंदावला आहे. नाशिक विभागातील साधारणत: तेरा टक्के नागरिकांनी करोना लसीचा पहिला डोसही घेतला नसल्याने संबंधित वृत्तात आहे. राज्यातही बुस्टर डोस घेण्याची मोहिम थंडावली आहे.
हे वास्तव असले तरी लोकांनी घाबरून जाऊ नये. कारण घराबाहेर पडताना थोडीशी दक्षता बाळगली तर साथरोगांना अटकाव करता येऊ शकतो हे लोकांनी करोना काळातही अनुभवले आहे. वारंवार हात धुणे आणि सामाजिक अंतर राखणे आजही सहज शक्य आहे. अंगात कणकण असली तर काही दिवस लोकांमध्ये मिसळणे टाळता येऊ शकेल.
ताप आाणि सर्दी झाली तर दवाखान्यात जायला हवे सरकारच्या लसीकरण मोहिमेला सकारात्मक प्रतिसाद द्यायला हवा. शेवटी, आपली दक्षता ही आपलीच जबाबदारी याचे भान जरी ठेवले तरी केवळ दिवाळीच नव्हे तर आगामी काळातील सगळेच सण तितक्याच उत्साहात साजरे करता येतील हे नक्की. तेव्हा दिवाळीच्या सर्वांना आरोग्यमय शुभेच्छा.!