Saturday, May 25, 2024
Homeब्लॉगएकमेकींना हात देऊया..

एकमेकींना हात देऊया..

सध्याच्या पिढीवर सोशल मीडियाचा मोठा दबाब आहे. सतत प्रेझेंटेबल दिसणे, आपल्याला पार्टनर असणे, त्याच्याबरोबरचे रोमँटिक फोटो सतत शेअर करत राहणे ही त्यांची गरज बनत आहे. सुपरवूमन बनण्याचा सोसही आहे. या महिलादिनी या नव्या समस्यांचा उहापोह व्हायला हवा. आपले मूल किती आणि कसे हुशार आहे, हे सिद्ध करण्याची अहमिका आयांमध्ये बघायला मिळते. अशा अनेक गोष्टींचा दबाव नाकारण्याची वेळ आता आली आहे.

दर वर्षी साजरा होणारा आंतरराष्ट्रीय महिलादिन महिलांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे, त्यांच्या बदलत्या कक्षांची आणि विस्तारत्या क्षितिजांची दखल घेण्याचे, त्यांच्यातील सर्व शक्तींचा सन्मान करण्याचे महत्त्वपूर्ण व्यासपीठ आहेच, त्याचबरोबर बदलत्या काळात महिलांच्या मनोवस्थेत झालेले बदल योग्य की अयोग्य या प्रश्नावर चर्चा करण्यासाठीदेखील याचा उपयोग होणे गरजेचे आहे, असे मला वाटते.

माझ्या दृष्टीने पहिला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आता महिलांनी ‘नाही’ म्हणण्यास वा नकार देण्यास शिकणे गरजेचे आहे. हे मी स्वत:च्या उदाहरणावरून सांगू शकते. आपल्यामध्ये प्रचंड उत्साह असतो. सगळे काही करून बघावेसे वाटत असते. येणारे प्रत्येक आमंत्रण स्वीकारण्याची, येणारी प्रत्येक जबाबदारी पेलण्याची मानसिकता असते. अगदी व्यावसायिक जबाबदार्‍यांपासून घरगुती जबाबदार्‍यांपर्यंत शक्य होईल ते सगळे पेलण्याचा आपला प्रयत्न असतो. म्हणजेच घरगुती कार्यक्रम, सामाजिक कार्यक्रम… माझ्या क्षेत्राबाबत बोलायचे तर पुरस्कार वितरणाचे समारंभ, फॅशन शो अशा अनेक प्रसंगांना उपस्थित राहण्याचा माझा प्रयत्न असतो. पण कितीही प्रयत्न केले तरी ते शक्य होत नाही, तेव्हा आपण स्वत:ला दोषी समजू लागतो, हिरमुसतो आणि आपल्या गैरहजेरीचा कोण कसा अर्थ घेईल याचा विचार करत राहतो. पण यापुढे तरी स्वत:ला अशा प्रकारे दोषी समजणे बंद करायला हवे, असे मला वाटतो. त्यामुळेच महिलांनी प्राधान्यक्रम ठरवणे गरजेचे आहे. नकार देताना काय वाटेल याचा फार विचार न करता आपल्या शरीराचा आपण आदर करायला हवा, काळजी घ्यायला हवी आणि त्याच्या क्षमतेचा योग्य ठिकाणी उपयोग करून घ्यायला हवा, हा विचार मनावर बिंबवणे गरजेचे आहे.

- Advertisement -

आजही स्त्रियांच्या अनेक महत्त्वाच्या बाबींबद्दल सर्वार्थाने बोलले जात नाही. उदाहरणार्थ, गरोदर स्त्रीला या दिवसांमधील रंजक अनुभव सांगितले जातात. पण या सगळ्यापलीकडेही काही सांगण्याची गरज आहे, हे दिवस म्हणजे केवळ नऊ महिन्यांमधले बदल नसून यानंतर तुझे संपूर्ण आयुष्य बदलणार आहे, हे तिला गांभीर्याने सांगायला हवे. त्यामुळेच या नऊ महिन्यांमध्ये तू स्वत:साठी जगून घे, असे तिला सांगायला हवे. मला आधीपासूनच मैत्रिणींची डोहाळ जेवणं करायला खूप आवडायचे. आता तर मी अधिक मनापासून हा कार्यक्रम साजरा करते आणि तेव्हा आवर्जून सांगते की, अजिबात संकोच करू नकोस. याकाळात आधी स्वत:बरोबर थांब, स्वत:बरोबर पुरेसा वेळ घालव कारण त्यानंतर आयुष्यात परत असा वेळ मिळणार नसतो.

रजोनिवृत्तीबाबतही खूप कमी बोलले जाते. आजपावेतो कोणीही याविषयी माझ्याशी बोललेले नाही. आम्ही कामाच्या धबगड्यात इतक्या हरवल्या होतो की रजोनिवृत्तीचा काळ कसा सरला हे कळलेही नाही, असे आधीच्या पिढीतल्या महिला सांगतात. आता किमान रजोनिवृत्तीच्या आधी आणि नंतरच्या काळात स्त्रियांना काही त्रास होत असल्याचे मान्य तरी केले जात आहे. पण त्याविषयी बोलणे, अनुभव शेअर करणे गरजेचे आहे. एक स्त्री आयुष्यात इतके शारीरिक बदल सहन करत असेल तर बायकांनी तरी एकमेकींशी यावर बोलणे गरजेचे आहे. बहीण, मैत्रीण, शेजारीण यांनी आपली जबाबदारी ओळखायला हवी.

सध्या आपले मूल किती आणि कसे हुशार आहे, हे सिद्ध करण्याची अहमिका आयांमध्ये बघायला मिळते. मुलांना ‘स्पून फिडिंग’ करायचे आणि न कळत्या वयातच त्यांच्यातील कलागुणांचे अवाजवी कौतुक करायचे, यात सध्याचा मातृवर्ग हरखून गेल्याचे दिसते. ही चुकीची पद्धत मोडीत काढण्याची गरज आहे. मुलांवर आपल्या अपेक्षा न थोपवणे, अतिरेकी कौतुक करून त्यांच्या वाढीत अडथळा उत्पन्न करण्याचे उद्योग थांबवणे याचा विचार महिलांनी करायला हवा. खरे सांगायचे तर आजघडीला मी पुरुषांकडून काहीही अपेक्षा ठेवत नाही. अपेक्षा स्वत:कडून असाव्यात, असे मला वाटते. निश्चितच महिलांनी अधिक जबाबदारीने वागण्याची अपेक्षा आहे; त्याप्रमाणे तिने मल्टी टास्किंगमधून स्वत:ची सुटका करून घ्यावी, हीदेखील अपेक्षा आहे.

सगळी कामे आपणच करणे अयोग्य आहे, असे मला वाटते. मी स्वयंपाकही करेन, नोकरीही करेन, मुलांवर संस्कारही मीच करेन, मला छंदही जोपासायचे आहेत, मला चांगलेही दिसायचे आहे, फिटनेसही राखायचा आहे. अशी सगळी ध्येये ठेवून पुढे जाणे केवळ अशक्य आहे. हेदेखील मी स्वानुभवावरून सांगू शकते. अलीकडेच मी फिजिओथेरपी घेतली, पण प्रामाणिकपणे तेवढे करायचे म्हटले तर अन्य कामांसाठी पुरेसा वेळ हाती राहत नसल्याचे अनुभवले. एक गोष्ट हाती घेतली तर एखादी गोष्ट मागे राहून जाते. असे असताना इतक्या डिंगर्‍यांवर नाचायचे ठरवले तर हाती काहीच लागणार नाही. इतकेच नव्हे तर सहा तासांची निश्चिंत झोप देखील सुटून जाते. म्हणूनच महिलांनी उत्साहाने खांद्यावर घेतलेले जोखड उतरवण्याची वेळ आता आली आहे. मला नांगरताही येईल, पेरताही येईल, उफाळणीही मला जमेल या विचारातून स्वत:ला मोकळीक देण्याची गरज तिने ओळखायला हवी.

सध्या तरुण मुलींनी सोशल मीडियाचे प्रचंड दडपण घेतल्याचे जाणवते. प्रत्येकीला प्रत्येक सणाचा, इव्हेंटचा चांगला फोटो हवाच असतो. घरी मदतनीस म्हणून काम करणार्‍या मुली, कॉश्चुम असिस्टंट, असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम करणार्‍या तरुणी यांच्याकडे बघताना ही बाब जाणवते. जगण्याइतके पैसे मिळू लागले की त्यांना फोन घेता येतो, त्याबरोबर सोशल मीडियाही येतो आणि मग एका मोठ्या गुंत्याची सुरुवात होते. एखाद्या लग्नाला गेल्यावर सोशल मीडियावर टाकण्यासाठी फोटो काढावेच लागतात! बरेचदा मीदेखील फेटा बांधेन, मेेहेंदी काढेन आणि इफेक्टसह फोटो टाकेन या विचारांचे प्रेशर घेऊन काढलेले आणि शेअर केलेले असतात. सोशल मीडियासाठी पार्टनर असणे हे आता ‘कूल’ वाटू लागले आहे. त्यामुळेच आता एकटे राहण्यातली मजा हरवली आहे, असे वाटते. पार्टनर नसतानाचा एकटीचा काळ मी स्वत: खूप एन्जॉय केला. टिपिकल असली तरी मी लग्नाची स्वप्ने पाहिली. पण स्वप्न साकारण्याच्या नादात हातून काही चूक तर होणार नाही ना, याची जबाबदारी मुलींनी ओळखायला हवी. बॉयफ्रेंड असणे आणि आपण तासन्तास कोणाबरोबर तरी व्यस्त आहोत हे दाखवणे या गरजेतून आता आपण मोकळे व्हायला हवे.

आता या दबावातून आपणच आपल्याला मुक्त करण्याची गरज आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या