Monday, November 25, 2024
Homeब्लॉगजपूया सुरांचा अक्षय्य ठेवा

जपूया सुरांचा अक्षय्य ठेवा

थोर, अलौकिक, अभ्यासू, प्रयोगशील आणि मुख्य म्हणजे आत्मानंदासाठी गाणार्‍या कुमार गंधर्वांच्या जन्मशताब्दीचे वर्ष सुरू होत आहे. यानिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतींना वंदन करण्याचा योग प्राप्त होणार्‍या प्रत्येकाने स्वत:ला भाग्यवान समजायला हवे, कारण देवाचे दर्शन घेण्याचे आणि त्याला अभिवादन करून त्यावर स्तुतीसुमने उधळण्याचे भाग्य काहीजणांनाच प्राप्त होते.

तो काळ भारलेला होता की भारलेल्या व्यक्तिमत्त्वांचा वावर असल्यामुळे काळाची तशी ओळख होती या गुंत्यात न पडलेलेच चांगले. पंडित कुमार गंधर्व हे असेच एक झपाटलेले व्यक्तिमत्त्व! मागे वळून बघताना, त्यांचे संगीत ऐकताना, त्यांच्या चिजांमध्ये बुडून जाताना, त्यांची निर्गुणी भजने ऐकताना वा गीतांमध्ये बुडी घेताना झपाटलेपणाचे दोन-चार कण आपल्यालाही चिकटतात आणि पुढचा दिवस तो राग, स्वर, शब्द, रचना, सादरीकरण आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यातील समरसता वृत्तीचा ताबा घेऊन राहते.

‘जो जे वांच्छिल, तो ते लाहो…’ या प्रार्थनेप्रमाणे गंधर्वांच्या गाण्याने प्रत्येकाला हवे ते दिले. त्यांच्या अभ्यासपूर्ण सादरीकरणाने परीक्षक आणि अभ्यासकांबरोबरच सर्वसामान्य श्रोत्यांनाही मंत्रमुग्ध करून टाकले. त्यांच्या प्रत्येक प्रयोगामध्ये बुद्धी आणि मनाची अजोड सांगड बघायला मिळते. परंपरेचे भान आणि नवनिर्मितीची आस पदोपदी जाणवते. प्रत्येक सादरीकरणातून, मांडलेल्या संकल्पनेतून त्यांचा प्रगल्भ विचार प्रकट होतो. म्हणूनच रुढार्थाने कुमार गंधर्व हयात नसले तरी त्यांची रचना ऐकताना ते समोर असल्याचा भास होतो आणि काळाची बंधने लांघून मन त्या अरुपाशी एकरुप होऊन जाते. कुमार यांच्या गाण्याला एक वेगळीच सामाजिक प्रतिष्ठा किंवा ‘उंची’ लाभलेली.

- Advertisement -

‘कुमारांचे गाणे’ हा कविवर्य मंगेश पाडगावकरांच्या कवितेचाही विषय ठरला. कुमार यांच्या गाण्याला विस्मयाचे, गूढतेचे वलय लाभण्याचे एक कारण म्हणजे आज कुमार काय गातील? हा प्रश्न ते आपल्या श्रोत्यांच्या मनात कायम ठेवत. त्या प्रश्नाचे मूळ होते कुमारांच्या अभिव्यक्तीत आणि त्यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे त्या अभिव्यक्तीमागच्या त्यांच्या विचारात. तो एका कलावंताचा विचार असे. खूप खूप वर्षांपूर्वी शिवपुत्र सिद्धरामय्या कोमकली हा सहा वर्षांचा मुलगा आपल्या गाण्याने खळबळ माजवत होता. हा मुलगा कोणत्याही प्रख्यात गायकाच्या गाण्याच्या ध्वनिमुद्रिकेची हुबेहूब नक्कल करत असे. तेदेखील लगेचच आणि अनेक श्रोत्यांच्या उपस्थितीत. कर्नाटकातल्या एका स्वामींनी या मुलाला ‘कुमार गंधर्व’ ही उपाधी दिली. पुढे नक्कल थांबली आणि अस्सल संगीताचा शोध सुरू झाला तो देवधरांच्या संगीत विद्यालयात. कुमारांना परंपरेच्या प्रवाहात वाहणे कधीच मंजूर नव्हते. त्यामुळे या अथांग संगीत विश्वात ‘मी कोण’, ‘माझे स्थान काय?’, ‘माझी शैली कोणती?’ या प्रश्नांच्या उत्तरांचा जीवघेणा शोध सुरू झाला. पण आपले गाणे सापडले आणि ‘मी पण’ गवसले तेव्हा क्षयरोगाचा आघात झाला. परिणामस्वरूप गाणे बंद झाले. तो रोग आयुष्यातील काही बहुमोल वर्षे आणि एक फुफ्फुस यांचा घास घेऊनच दूर झाला. या काळात कुमारांच्या कलावंत मनाने काय आक्रंदन केले असेल याची कल्पनाच केलेली बरी! पण या कलावंत मनामुळेच ते हा आघात पचवू शकले. याच काळात त्यांनी संगीतावर मूलभूत स्वरुपाचा विचार केला.

यानंतर कुमार मैफलीत आले, ते त्यांचे नवे गाणे घेऊन. एक फुफ्फुस गमावल्यामुळे आलेल्या मर्यादा लक्षात घेऊनच त्यांचे नवे गाणे जन्मले होते. त्या मर्यादेमुळे आलापी किंवा विलंबित लयीत दीर्घकाळ गाणे त्यांना शक्य नव्हते. म्हणून त्यांनी ते वगळले. पल्लेदार तानांऐवजी छोट्या, चमकदार ताना निवडल्या. छोटे मासे सुळकन इकडून तिकडे जातात तशा या ताना-दमसासाच्या मर्यादेनुसार आवाजाचा लगाव ठरवला. कुमारांच्या ‘नव्या गाण्याचे’ त्यांच्या भक्तगणांनी प्रचंड स्वागत केले. एका मैफलीत कुमारांनी त्या रागात वर्ज्य असलेला स्वर घेतला. सगळेच चकित. का बरे असे? कुमार म्हणाले, ‘बराच काळ तो स्वर मी येऊ का? असे विचारत होता. शेवटी त्याला ‘ये म्हटलं.’ यावर सर्वांची प्रचंड दाद. का बरे? मग स्वर वर्ज्य असणे वगैरे शास्त्रास, चौकटींना काही अर्थच उरणार नाही पण ‘बंडखोर कलावंत’ असे वलय लाभल्यावर हेसुद्धा चालू शकते, हे कुमारजींनी दाखवून दिले. अर्थात, असा प्रसंग केवळ एकमेव अपवाद. ‘मालवती’, ‘मधसूरजा’, ‘लगन गांधार’ हे राग पूर्णपणे कुमारांचेच. संपूर्ण शास्त्र पचवून, विचारातून बनलेले आणि सर्वांना आवडलेले. ‘गांधी मल्हार’ हा बहुधा ‘बनवला’ असावा. ‘मला उमजलेले बालगंधर्व’ हा प्रयोग त्यापैकीच एक. बालगंधर्व हा कलावंत कुमार गंधर्व यांच्या कलावंत मनाला भावला, दिसला तसाच त्यांनी तो मांडला. त्यावर टीका झाली खरी पण कुमार यांनी बालगंधर्वांच्या ‘आ’काराच्या तानांचा, त्यांच्या गाण्यातल्या गोडव्याचा बारकाईने अभ्यास केला होता. असंख्य पदांचे स्वरलेखन केले होते. लोकही कुमारांचे गाणे न चुकता ऐकत राहिले. माळव्यातली लोकगीते, नाथपंथीयांच्या निर्गुणी भजनातली नादमयता यांचा आनंद त्यांनी लुटला तसेच इतरांनाही दिला. संत कबीर, संत सूरदास, संत तुकाराम यांच्या रचनांवर प्रचंड विचार करून त्या सादर केल्या.

कुमारांनी कधी कुणाचे मन दुखावल्याचे ऐकिवात नाही. त्यांनी खूप माणसे जोडली. वैयक्तिक आयुष्यात अनेक दुःखे पेलून, पचवून कवितेत ‘शोक’ हे नाव घेऊन नवनव्या चिजा बांधल्या. दर वसंत पंचमीला तंबोर्‍याची उत्तम जोडी घेणे हा त्यांचा छंद. सुरात मिळालेले तंबोरे ऐकणे, स्वरांच्याच विचारात, आनंदात निमग्न राहणे, संगीताची उपासना करणे हा त्यांच्या जगण्याचा भाग होता. यामुळेच स्वरदेवतेनेही त्यांना सर्व काही भरभरून दिले आणि मिळालेले सर्व काही त्यांनी श्रोत्यांमध्ये वाटून टाकले. आपल्याला मिळालेला हा ठेवा अक्षय्य आहे, अपार आहे आणि अनमोल आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या