श्री. देवेंद्र फडणवीसजी, मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
महोदय,
नाशिक नगरीत आपले स्वागत. नाशिकमध्ये होणार्या सिंहस्थ कुंभमेळा- २०२७ चे नियोजन सुरू आहे. आपणही त्याचा आढावा घ्याल. त्यानिमित्ताने स्थानिक वृतपत्र समूह म्हणून काही बाबींकडे आम्ही आपले लक्ष वेधू इच्छितो. स्थानिकांच्या भावभावना तसेच शहराच्या गरजांबाबत, 54 वर्षाची परंपरा असलेले स्थानिक वृत्तपत्र म्हणून ‘देशदूत’ नेहमीच दक्ष असते.
नाशिकला ओळख देणारा व हजारो वर्षांची परंपरा असलेला सिंहस्थ कुंभमेळा आपणास परिचित आहे. नुकत्याच पार पडलेल्या प्रयागराजच्या महाकुंभमेळ्याचे आपण साक्षीदार आहात. त्याची विशालता, व्यापकता आणि आर्थिक क्षमताही आपण अनुभवली आहे. याच पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर मध्ये शैव आखाड्यांचा व नाशिक मध्ये वैष्णव आखाड्यांचा सिंहस्थ कुंभमेळा होत आहे.
काही महिन्यांपासून वृत्तांकन करताना त्र्यंबकेश्वर आणि नाशिकमधील काही मुद्द्यांकडे आम्ही लक्ष वेधले आहे. या दोन्ही ठिकाणी काही मुद्दे समान आहेत. लाखोंनी येणारे भाविक, गर्दीचे नियोजन, सोयीसुविधा, वाहनतळे, यातायात व्यवस्था, आरोग्य सुविधा, पाण्याची उपलब्धता, आपत्कालीन व्यवस्थापन, अतिक्रमणे, अरुंद रस्ते अशी काही आव्हाने या दोन्ही ठिकाणी आहेत.
यंदाची संभाव्य गर्दी लक्षात घेता यासंदर्भात व्यापक नियोजन व आयोजन गरजेचे आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये प्रामुख्याने छोटे रस्ते, कुशावर्त – तेथील स्वच्छ पाण्याचे व्यवस्थापन, गावातील कचर्याचे व सांडपाण्याचे व्यवस्थापन आणि त्याबरोबरीने एक धार्मिक पवित्र शहर असतानाही मंदिराभोवती फोफावलेला मद्य व्यवसाय, या सर्व बाबी दखलपात्र आहेत.
नाशिक हे मोठे शहर. रस्त्यांचे नियोजन, रामकुंड नदी परिसर, पाण्याची स्वच्छता, काँक्रीटमुक्त गोदावरी, असे अनेक मुद्दे धसास लावणे आवश्यक आहे. नाशिकमध्येही एसटीपी चे व्यवस्थापन गरजेचे आहे. गोदावरी गंगेपेक्षाही प्राचीन नदी मानली जाते. तिच्या पाणी स्वच्छतेबाबत शासकीय अहवाल काही सांगत असतील तरी सांडपाणी पाणी थेट नदीत मिसळत असल्याने तिची होणारी दुरवस्था नाशिककरांना आता उघड्या डोळ्यांनी बघवत नाही. या सर्व मुद्द्यांबरोबरच नाशिकमधील वाढत्या गुन्हेगारीकडेसुद्धा आम्ही आपले लक्ष वेधू इच्छितो.
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी प्राधिकरणाची घोषणा आपण केली आहे. स्थानिक प्रशासनाने आराखडा तयार केला आहे. सर्व विभागांची तयारी सुरु आहे, मात्र निधीची तरतूद प्रतीक्षेत आहे. कमी काळात खूप मोठे नियोजन करायचे आहे. यासाठी नाशिकमधील सर्व घटक आपल्याबरोबर सकारात्मकतेने उभे आहेत याची आपणास खात्री असावी. नाशिक एक सुंदर पवित्र आणि सुरक्षित शहर असावे असे आपणासही वाटते याची जाणीव आम्हाला आहे. म्हणूनच, येऊ घातलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याबाबत काही बाबी आपल्या निदर्शनास आणून देण्यासाठी हा पत्र प्रपंच. आपण निश्चित लक्ष घालाल आणि देशदूतच्या विनंतीस मान द्याल, ही खात्री वाटते.
- डॉ. वैशाली बालाजीवाले, संपादक, देशदूत