Sunday, May 26, 2024
Homeनाशिकखते-बियाण्यांच्या साठेबाजांविरोधात मोहीम

खते-बियाण्यांच्या साठेबाजांविरोधात मोहीम

नाशिक । Nashik

औरंगाबादमध्ये खतांचा काळाबाजार उघडकीस आल्यानंतर खडबडून जागे झालेल्या जिल्हा परिषदेच्या कृषी विभागानेही जिल्ह्यातील खते व बियाण्यांच्या साठेबाजांविरोधात मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेंतर्गत आतापर्यंत जिल्ह्यामध्ये दोन हजारावर दुकानांवर कारवाई करताना त्यांच्याकडून तब्बल ६८ लाख रूपयांची खते आणि बियाणे जप्त करण्यात आली आहेत. याशिवाय जिल्ह्यात सात दुकानांचे परवाने देखील रद्द करण्यात आले आहेत.

काही दिवसांपूर्वी औरंगाबादमध्ये खते व बियाण्यांच्या काळ्या बाजाराच्या बातम्या येऊन धडकल्यानंतर कृषीमंत्री दादा भुसे यांनी परवानाधारक कृषी निविष्ठा केंद्रांची तपासणी करण्याचे आदेश दिले होते. यानुसार जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्यावतीने निविष्ठा केंद्रांच्या तपासणीसाठी मोहिमच उघडली आहे. या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील सुमारे २०८८ दुकानांची आतापर्यंत तपासणी करण्यात आली आहे. यातील त्रुटी आढळून आलेल्या सुमारे ५० पेक्षाही अधिक दुकानांना विक्रीसाठी मनाई करण्यात आली आहे.याशिवाय या कारवाईत आतापर्यंत सुमारे ६७ लाख ८१ हजार रूपयांचे सदोष बियाणे, खते आणि किटकनाशकांच्या जप्तीची कारवाई करण्यात आली आहे.

- Advertisement -

परवाने रद्दच्या कारवाईत खतांच्या तीन दुकानांवर तर बियाण्यांच्या चार दुकानांवर कारवाई करण्यात आली. याशिवाय चांदवड व जळगांव नेऊर (ता. येवला) येथे गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.जिल्हाभरात कृषी केंद्रांच्या तपासणीकरीता ४८ गुणवत्ता निरीक्षक नियुक्त करण्‌यात आले आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये बियाणे विक्रीची ८०० दुकाने, खते विक्रीची ८४५ दुकाने तर कीटकनाशक विक्रीच्या ४४३ दुकानांवर कारवाई करण्यात आली.या तपासणी मोहिमेमध्ये बियाण्यांचे ३५५ नमुने , खतांचे १३६ नमुने तर किटकनाशकांचे ४५ बियाणे असे ५३६ नमुने आतापर्यंत ताब्यात घेण्‌यात आले आहेत. हे नमुने तपासणीकरीता प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. तपासणी अहवालात दोष आढळून येणाऱ्या नमुन्यांनंतर संबंधित दुकानदारांवर कारवाई करण्यात येणार आहे.

आतापर्यंत कारवाईच्या तपशीलानुसार ८ लाख २७ हजार रूपयांचे बियाणे, ५८ लाख ३७ हजार रूपयांची खते कर १ लाख १७ हजार रूपयांची किटकनाशके असे सुमारे ६८ लाख रूपयांचे साहित्य जप्त करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्यावतीने देण्यात आली.

- Advertisment -

ताज्या बातम्या