नाशिक । प्रतिनिधी Nashik
रेशनच्या धान्य वितरणातील अनियमितता, लाभार्थीना हक्काचे धान्य देण्यात होणारी टाळाटाळ, दुकान सतत बंद ठेऊन ग्राहकांना वेठीस धरणे अशा एक ना अनेक तक्रारी असणाऱ्या जिल्ह्यातील सहा रेशन दुकानदारांचे परवाने जिल्हा पुरवठा विभागाने रद्द केले आहेत. याशिवाय ई-केवायसी नोंदणीत हलगर्जीपणा करणाऱ्या ७३ रेशन दुकानदारांना पुरवठा विभागाने दंड ठोठावला आहे.
रेशन धान्य वितरणात बायोमेट्रीक मशिनवर थंब घेऊन ग्राहकांना धान्य वितरीत होत असल्याने आता बऱ्यापैकी पारदर्शकता आली आहे. असे असले तरी रेशन दुकानदारांच्या कारभाराबाबत सतत तक्रारी होतात. जिल्हा पुरवठा विभागातर्फे जानेवारी ते मे या कालावधीत रेशन दुकानांची नियमित तपासणी करण्यात आली. यामध्ये १ हजार ३९० दुकानांना अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहाणी केली. या पहाणीत ८३ दुकानांच्या कारभारात अनियमितता आढळून आली.
नियमांचे पालन करण्याची जबाबदारी रेशन दुकानदारांची आहे. धान्याचे रजिस्टर अपडेट न ठेवणे, लाभार्थीना वेळेत धान्य न मिळणे, दुकान बंद असणे यासारख्या बाबी निदर्शनास आल्या. सूचना करूनही संबंधित दुकानदारांकडून ई-केवायसी नोंदणीला हवा तसा प्रतिसाद मिळत नव्हता.
निफाड १५, धान्य वितरण अधिकारी नाशिक १३, नाशिक ११, नांदगाव ८, चांदवड ७, दिंडोरी ५, मालेगाव ४, बागलाण ४, कळवण ३, इगतपुरी ३ अशा एकूण ७३ रेशन दुकानांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
नियमांचे पालन करण्याची जबाबदारी रेशन दुकानदारांची आहे. दुकानांची नियमित तपासणी सुरूच राहणार असून, दोषी दुकानदारांवर परवाना रद्द सारखी कठोर कारवाई केली जाऊ शकते.
कैलास पवार, जिल्हा पुरवठा अधिकारी





