रंगभूमी, चित्रपट आणि दूरचित्रवाणी मालिका अशा सर्वच माध्यमांतून आपल्या अभिनय कर्तृत्वाचा ठसा उमटवून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक विक्रम चंद्रकांत गोखले (वय ७७) यांचे प्रदीर्घ आजाराने खासगी रुग्णालयात निधन झाले.
सीमेवर लढणाऱ्या जवानांना अर्थसाह्य करण्याबरोबरच रोखठोक भूमिका घेणारे पारदर्शी व्यक्तिमत्त्व असा सामाजिक भान जपणारा कलाकार काळाच्या पडद्याआड गेला आहे. त्यांच्यामागे पत्नी वृषाली आणि कन्या असा परिवार आहे.
अभिनयाचा आणि संगीताचा जन्मजात वारसा लाभलेल्या या अभिनेत्याने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टी तसंच नाट्यसृष्टीतही अढळपद निर्माण केलं. सर्वगुणसंपन्न कलावंत म्हणजेच अभिनेते विक्रम गोखले.
भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिल्या नायिका म्हणून लौकिक असलेल्या कमलाबाई गोखले या त्यांच्या आजी आणि चरित्रनायक म्हणून ठसा उमटविणारे चंद्रकांत गोखले हे त्यांचे वडील. कलाप्रेमी कुटुंबात आणि हेमावती गोखले या आईच्या संस्कारात विक्रम गोखले यांच्या मनात कलेवरची निष्ठा रुजणे स्वाभाविक होते.
अभिनयासोबतच त्यांनी लेखन आणि दिग्दर्शनही केले आहे, त्यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘आघात’ हा चित्रपटाचे समीक्षकांनी विशेष कौतुक केले होते. २०१३ साली प्रदर्शित झालेल्या ‘अनुमती’ या चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले, घशाच्या त्रासामुळे २०१६ मध्ये त्यांनी नाटकातील अभिनय संन्यास घेतला आहे. नवोदित कलावंतांना अभिनय प्रशिक्षण देण्याचे अध्यापन कार्य गोखले सध्या करीत होते.
अभिनय क्षेत्रात हयात घालवूनही उपेक्षित राहिलेल्या कलाकारांना त्यांच्या वृद्धापकाळी हक्काचे घर असावे या उद्देशातून विक्रम गोखले यांनी स्वत:ची जागा अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाला देऊन दातृत्वाचा मानदंड प्रस्थापित केला.
क्षेत्रातील योगदानाबद्दल विक्रम गोखले यांना २०१५ मध्ये विष्णूदास भावे जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. बलराज साहनी-साहिर लुधियानवी फाउंडेशनतर्फे बलराज साहनी पुरस्कार, क्रीडामहर्षी हरिभाऊ साने जीवनौरव पुरस्कार, पुलोत्सव सन्मान यांसह चित्रपती व्ही.शांताराम जीवनगौरव पुरस्कार अशा महत्त्वाच्या पुरस्कारांचे ते मानकरी होते.
विक्रम गोखले यांचा कोणत्याही पुरस्कारांवर विश्वास नव्हता. त्यांनी शासकीय पुरस्कारांनाही नकार दिला. एका मुलाखतीत त्यांनी आपलं मत मांडताना सांगितलं होतं की, ‘पुरस्कार सोहळे हे फक्त फॅशन झाली असून पैसे खिशात घेऊन पुरस्कार घेणारे मी पाहिले आहेत. अशा मांदियाळीत मला बसण्यात स्वारस्य नाही. कोणत्याही पुरस्काराने एखादा नट चांगला आहे की नाही हे सिद्ध होत नाही. त्याचं कामच बोलतं.’