Thursday, October 31, 2024
Homeशब्दगंधआयुष्यभर श्रमला, आला न कधी क्रोध, लेकासाठी बापाने आणले, वाघिणीचे दूध

आयुष्यभर श्रमला, आला न कधी क्रोध, लेकासाठी बापाने आणले, वाघिणीचे दूध

ते 1972 साल होतं. मी 5वीत होतो. 4थीनंतर आम्हाला प्रथमच इंग्रजी विषय आला होता. इंग्रजी कठीण असतं. ती अशी समजत नाही. शिकवणी लावायलाच हवी. अशी अनेकांनी गळ घातल्याने, माझ्या वडिलांनी मला निवृत्त शिक्षक एस.डी.जोशी यांचेकडे शिकवणी लावली. ते इंग्रजीचे निष्णात शिक्षक होते. ते आम्हाला होमवर्क म्हणून, रोज दहा शब्दांचे स्पेलिंग, उच्चार आणि अर्थ पाठ करायला सांगत. त्यामुळे घरी आल्यावर, मी ओट्यावर बसून जोर, जोरात पाठांतर करायचो. एकदा, त्याचा त्रास होवून आमचे शेजारी स्व.नरसिंगबाबा बाहेर आले व माझ्यावर ओरडले. तेव्हा माझे वडिल बाहेर आले.

ते वडिलांना म्हणाले, नारायण, आरे हाई इंग्रजी मंजे वाघिन नं दूध शे राजा. ती अशी कोनलेबी येत नही. पोपटनागत रटावर, तर ती येवावूच नही. येन्हं हाई पाठांतर बंद कर भो. दुफारनी जप मुडीजास, येन्हामुये. वडिलांनी मला पाठांतर बंद करायला लावून, घरात पिटाळले. मी आनंदानेच घरात धूम ठोकली. काही दिवसांनी आमच्या घरी तत्कालीन नगराध्यक्ष स्व.योगराजसिंह परीहार आले. ते वडिलांचे मित्र होते. त्यांनी माझी विचारपूस केली. मी पाचवीत जातो हे ऐकून ते खुश झाले. त्यांनीही माझ्या वडिलांना हेच सांगितले, जिभाऊ, पोर्‍या पाचवीम्हा गया, ते येले इंग्रजी विषय अशीन. इंग्रजी हाई वाघिन नं दूध से. ती येल्हे चांगली येवो, असं तुले वाटत व्हईन, तं येले इंग्रजीनी विरकरनी डिक्शनरी आनी दे. माझ्या वडिलांना ते आदरणीयच होते. वडिलांनी तेथेच होकार भरला आणि दुसर्‍या दिवशी ते मला गावातील बालाजी, व्हरायटी आणि प्रमोद जनरल स्टोअर्सवर घेवून गेले. डिक्शनरीची चौकशी केली. मात्र, ती कुणाकडेच ती उपलब्ध नव्हती. उलट मला कश्याला हवी डिक्शनरी? असं म्हणून त्यांनी टाळून लावलं. मात्र, माझ्या वडिलांच्या डोक्यात ते वाघिणीचे दूध घर करुन बसलं होतं. त्यांनी प्रमोद जनरल स्टोअर्सचे मालक स्व.रघुनाथ अमृतकर, जे माझ्या वडिलांचे चांगले मित्र होते, त्यांना ऑर्डर देवून डिक्शनरी आणायला लावली. त्यांनीही कौतुकाने ते मान्य केले. आणि 25 डिसेंबर 1972 रोजी त्यांनी आम्हाला दुकानावर बोलवून के.बी.विरकर यांची डिक्शनरी माझ्या हातात दिली. त्या वेळी मी खूप बारका होतो. ते एव्हढं जाडजुड 1175 पेजेसचं बाड मला हातात घ्यायलाही अवजड वाटत होतं. मात्र, माझ्या बापाच्या डोळ्यात मला, मुलाला वाघिणीचे दूध मिळवून दिल्याचा अभिमान दिसत होता. तेव्हा ते गावातील प्रतिष्ठित अश्या मे.डेडिया अ‍ॅड सन्सकडे हमाली करत होते. पाठीवर एक क्विंटलच पोतं वाहून नेतांनाही, त्यांच्या मनात आपल्या मुलाला इंग्रजी यावं ही अभिलाषा निर्माण होणं, हीच माझ्या शैक्षणिक वाटचालीची पायाभरणी होती असं मला वाटतं.

आज त्या घटनेला 50 वर्षे होतील. वडिलांनी या जगाचा निरोप घ्यायलाही 20 वर्षे होतील. मात्र, वडिलांनी दिलेली ती डिक्शनरी आजही माझ्या संग्रही आहे. काळजात वसलेली आहे. 1972 साली या डिक्शनरीची 37 वी आवृत्ती होती. त्याकाळी त्यांनी 4 लाखाचा विक्रीचा टप्पा ओलांडला होता. असं प्रस्तावनेत नमूद आहे. दहावीपर्यंत हाताळून ती विस्कटून गेली होती. तिला माझ्या वडिलांनीच किरण प्रिंटींग प्रेसमधून पुठ्ठा बाईंडीग करुन आणल्याचंही मला स्मरतंय. ज्या योगे तिचं आयुर्मान वृध्दींगत झाले. माझ्या पुढील सर्व शैक्षणिक वर्षांत आणि नोकरीला असतांनाही ती माझ्या सोबत होती. तिनेच माझं इंग्रजीचं भरण, पोषण केलं. तीने कधीही मला नाऊमेद केलं नाही. मला माझ्या आयुष्यात अडलेल्या, प्रत्येक इंग्रजी शब्दांचा अर्थ तिने मला सांगितला. मी माझं बी.एड.इंग्रजी माध्यमातून आणंद, गुजरात येथून केलं. तिथंही ती माझ्या सोबतच होती. गुजरात राज्यात मी त्याकाळी इंग्रजीतील गुणवत्तेसाठी असलेली रु.15 हजारांची स्कॉलरशीप प्राप्त केली होती. याचं सारं बळ स्व.एस.डी.जोशी, स्व.व्हि.एम.पाटील, आर.जे.गुजराथी यांनी शिकवलेल्या इंग्रजीतून आणि त्या डिक्शनरीतूनच आलं होतं. तिच्या रुपाने माझे वडिलच माझ्या सोबत होते, आहेत असं मला आजही वाटतं.

- Advertisement -

मी चांगला वाचक झालो यालाही वडिलच कारणीभूत ठरलेत. ते त्या काळातील सातवी फायनल झालेले. त्यांना वाचनाची खूप आवड. सा.विवेक आणि सा.मार्मिक वाचणं हा त्यांचा नित्यक्रम होता. गावातील अरुणसिंह पुरभे यांच्या सायकल दुकानावर ही दोन्ही साप्ताहिक येत. तिथं माझ्या वडिलांची बैठक होती. दोन्ही समविचारी. त्यांच्यातल्या चर्चाही मी अनेकदा ऐकल्या होत्या. 5वीपासूनच मलाही वाचनात गती होती. वर्गात वाचन करायला शिक्षक मलाच आवर्जून उभं करत. हे मी घरी सांगायचो तेव्हा आई, वडिलांना कोण आनंद होई. एकदा, बाजाराचा दिवस होता. मुरमुर्‍यांमध्ये भेड करण्यासाठी वडिलांनी शेवचिवडा आणला होता. त्या पुडक्याच्या पेपरच्या कागदावर, संत नरहरी सोनारांची गोष्ट होती. ती त्यांनी मला सहज, माझी वाचन परीक्षा म्हणून वाचायला सांगितली. मी तो कागद अस्खलीत वाचून काढला. मलाही ती गोष्ट आवडली. दादांनी मला शाबासकी दिली. याचं बक्षिस म्हणून त्यांनी मला नवं कोरं हॅनरी सॅन्डोजचं घड्याळ देवून अचंबित केलं होतं. ते घड्याळ हातावर बांधून मी गल्लीभर फिरलो. शाळेत मित्रांना, शिक्षकांना अभिमानाने दाखवतांना माझ्या वडिलांचा मला खूप अभिमान वाटायचा. माझ्या वाचनाची आवड बघून, पुढच्या महिन्यापासून आमच्या घरी पोष्टाने चांदोबा येवू लागला. सोवियत लॅड बाल साहित्य साप्ताहिकही सुरु झाले आणि मी वाचू लागलो. वाचन वेडा झालो. मला बक्षिस, खाऊचे म्हणून मिळणारे पैसे पुस्तक खरेदीवर मोडू लागलो. मी दहावीपर्यंत साधारण 100 एक कथा पुस्तकं घेतल्याचं स्मरतंय. नंतर मला उपन्यास वाचायची सवय लागली. वेद प्रकाश आणि गुलशन नंदाची 90% पुस्तकं मी वाचली आहेत. अमळनेरला प्रताप कॉलेजला असतांना मी स्टेशनवरील एएचव्हिलर यांच्या स्टॉलवरुन नवं पुस्तक फक्त वाचण्यासाठी एक रुपयाला नेत होतो. साधारण तीन तासात वाचून ते परत करावं लागे. 78-85 हा प्रताप मधला कालखंड माझा वाचनाचा सर्वोत्तम कालखंड होता.

ान हजारेक पुस्तकं वाचली असतील. त्यातील 200 वर पुस्तकांवर समिक्षात्मक आणि 100 एक लेखक, कवींवर मी परिचयात्मक लेखन केलय. केवळ लोकसत्ता आणि मटा वाचून (आरके लक्ष्मण आणि विकास सबनिसांची व्यंगचित्र बघून) मी व्यंगचित्रकार झालो. आमच्या शाळेच्या ग्रंथालयातील पुस्तकांचे सर्वोच्च वाचन केल्याची नोंद आहे. आजही एक पुस्तक वाचल्याशिवाय मला झोप येत नाही. आणि, एका पुस्तकावर लिहिल्याशिवाय माझा आठवडा जात नाही. मला वाचनाने साहित्यिक आणि व्यंगचित्रकार केलंय. हे नमूद करायलाच हवं. माझं लेखन दैनिकात, मासिकात छापून येतं, याचा वडिलांनाही खूप आनंद वाटायचा. वडिलांना आम्ही घरी दादा म्हणायचो. सार्‍या गावासाठी मात्र ते जिभाऊ होते. अल्पशिक्षीत असले तरी जिभाऊंकडे अनुभवांनी आलेलं प्रगल्भ ज्ञान होतं. मोडी भाषेत तर त्यांना प्राविण्य होतं. शासकीय कागदपत्राचं भाषांतर करण्यासाठी अधिकारी त्यांना शोधत घरी येत. येथील नगराध्यक्षांचे पितामह म्हणून ज्यांची ओळख होती ते स्व.योगराजसिंह परीहार माझ्या वडिलांचे जीवश्चकंठश्च मित्र होते. त्यांच्याकडूनच त्यांना काही आयुर्वेदिक उपचारही माहीत झाले होते. त्यांच्या या ज्ञानाचा फायदा झाल्याचे अनेकांकडून आम्हाला आता कळते, तेव्हा जिभाऊंबद्दल मोठा अभिमान वाटतो. आजही जिभाऊ म्हणजे बाप मानूस व्हता ! असं सांगणारा कुणी भेटतो, तेव्हा आमची छाती अभिमानाने दोन इंच फुगली असा भास आम्हाला होतो.

सामान्य शेतकरी असूनही त्यांचा जनसंपर्क आणि लोकसंग्रह दांडगा होता. त्याकाळातील सत्ताधारी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष होणं, अल्पशिक्षित असून एका मोठ्या शिक्षण संस्थेची उभारणी करुन तिथं उपाध्यक्ष होणं, वकिलीचं शिक्षण नसतांना अनेकांची कोर्ट, कचेरी, खरेदी, विक्रीच्या कामात लिलया मदत करणं, समाजाचं अध्यक्षपद सलग 30 वर्ष त्यांनी सांभाळणं मला अचंबित करतं. त्यांच्या व्यक्तिमत्वाची विशालता दाखवतं. आईंच्या कार्यकुशलतेवर त्यांना मोठा विश्वास होता. संसारात पती-पत्नीचं योगदान, वाटा समसमान असतो असं आपण म्हणतो. मात्र, आपल्या हयातीतच आमची 12 बिघे जमिन आणि दोन्ही राहती घरं माझ्या आईच्या नांवे करुन देणारे आमचे दादा हे कृतीयक्त प्रबोधनकार होते, असं मला वाटतं. जन्मभर व्यासपिठावरुन प्रबोधनाची भाषणं करणारे आपल्या वैयक्तिक जीवनात त्या पासून कोसो दूर असतात. अश्या वेळी माझ्या वडिलांचं आधी केले, मग सांगितले हे तत्वज्ञान त्यांना संत परंपरेत नेवून बसवते. 20 वर्षांपूर्वी, 14 नोव्हेंबर 2002 साली त्यांनी या जगाचा निरोप घेतला. तेव्हाही ते अतिशय समाधानी होते. तुमची काही ईच्छा आहे कां? असं आई त्यांना म्हणाली. तेव्हा ते म्हणाले… काहीच नाही. मी एकदम समाधानी आहे. माझा एक मुलगा प्राध्यापक, दुसरा संपादक, मुलगी शिक्षिका, गृहिणी, जावाई प्राध्यापक, उद्योजक आहेत अजून काय पाहिजे? माझा संसार एकदम सुंदर आहे. आणि तू तो सुंदर केला. माझ्याकडून काही चुकलं असेल तर, तूच मला माफ कर! असं म्हणत त्यांनी चक्क आईसमोर हात जोडले होते. याचे आम्ही साक्षिदार आहोत. एका अर्थाने ते खरंच होतं. शेती, दुकानातील कष्टाची कामं आणि सामाजिक कामांमुळे दादा आमच्या वाट्याला कमीच यायचे. ती भर आईने भरुन काढली होती. आमच्या शिक्षणासाठी तिनं खूप खस्ता खाल्ल्या आहेत. आमचा निकाल लागायचा तेव्हा तो सर्व प्रथम तुमच्या आईला दाखवा असं म्हणारे दादा, मनाची श्रीमंती आणि जिवनातला समृध्द अनुभव आम्हाला शिकवून गेले. कोणत्याही पदावर नसणार्‍या जिभाऊंना आजही धरणगांवकर श्रध्देने आठवतात, यातच त्यांचे मोठेपण आहे. मी शतकमहोत्सवी पी.आर.हायस्कूलचा मुख्याध्यापक म्हणून सेवानिवृत्त झालो. भरत एका वृत्तवाहिनीचा संपादक आहे. तरी आम्ही जिभांऊची मुलं आहोत म्हणूनच, अर्ध धरणगाव आजही आम्हाला ओळखतं. हीच आमची खरी ओळख. आनंददायी आणि अभिमानास्पद. तीच आयुष्यभर जपण्यासाठी आम्ही धडपडत आहोत. आज जिभाऊंचे 19 वे पुण्यस्मरण. त्या निमित्ताने, मी आज पुन्हा एकदा त्यांनी आणून दिलेल्या, डिक्शनरीत हरवून गेलो. बापाने आणून दिलेल्या या वाघिणीच्या दुधाने मी इंग्रजीतून छान गुरगुरु शकतो. जिभाऊ, शेतकरी, कष्टकरी असले, तरी त्यांना अभ्यासाची आवांतर वाचनाचे महत्त्व माहित होते. त्यासाठी त्यांनी योग्य ती पाऊले उचलली. आज ते नाहीत. मात्र, ते जिथं कुठे असतील तिथं समाधानीच असतील. त्यांनी लावलेलं इवलंसं रोप, रुजलं, बहरलं, फुललं, फळांनी लदबदलं. त्यांनी पाहिलेल्या स्वप्नाची मी पूर्तता करु शकलो, हीच माझी श्रीमंती आहे, असं मी मानतो. त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन.

– ‘देवरुप’, नेताजी रोड, धरणगाव, जि.जळगाव.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या