अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
जिल्ह्यात होणार्या 11 नगरपरिषद व 1 नगरपंचायतीची निवडणुक मुक्त, शांततापूर्ण आणि पूर्णपणे नि:पक्षपाती वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी कडक पावले उचलली आहेत. मतदानापूर्वीचा दिवस, मतदानाचा दिवस तसेच मतमोजणीचा दिवस या एकूण तीन दिवसांसाठी ‘कोरडा दिवस’ जाहीर करणारे आदेश त्यांनी जारी केले आहेत.
मंगळवारी (2 डिसेंबर) संगमनेर, कोपरगाव, शिर्डी, राहाता, श्रीरामपूर, देवळाली प्रवरा, राहुरी, शेवगाव, पाथर्डी, जामखेड व श्रीगोंदा या 11 नगरपरिषदांसह नेवासा नगरपंचायतीमध्ये मतदान पार पडणार आहे. त्यानंतर बुधवारी (3 डिसेंबर) मतमोजणी करण्यात येईल. या पार्श्वभूमीवर, सोमवार 1 डिसेंबर (मतदानापूर्वीचा दिवस), मंगळवार 2 डिसेंबर (मतदानाचा दिवस) आणि बुधवार 3 डिसेंबर (मतमोजणी पूर्ण होईपर्यंत) जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या मद्य, ताडी तसेच अन्य अबकारी अनुज्ञप्त्या पूर्णतः बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
निवडणूक काळात कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार, गोंधळ किंवा कायदा-सुव्यवस्थेतील ढवळाढवळ टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचेही आदेशात नमूद आहे. दरम्यान, या नियमांचे उल्लंघन करणार्या अनुज्ञप्तीधारकांवर महाराष्ट्र मद्यनिषेध व अबकारी कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची स्पष्ट आदेश दिली आहे. या निर्णयामुळे निवडणूक प्रक्रिया सुरळीत, सुरक्षित आणि पारदर्शक रित्या पार पडण्यास मदत होणार आहे, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.




