धुळे । प्रतिनिधी dhule
नेपाळसह (Nepal) गोवा (Goa), उत्तर प्रदेश (Uttar Pradesh), बिहार (Bihar) मध्ये लपून आणि मोबाईल सिमकार्ड व आपला ठावठिकाणा बदलून सात महिन्यापासून पोलिसांना चकवा देणार्या मद्यतस्कर दिनू डॉनला अखेर तालुका पोलिस ठाण्याच्या पथकाने गजाआड केले. त्याला परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथून अटक करण्यात आली. त्याच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
पथकाला पाच हजारांचा रिवार्ड : या विशेष कामगिरीबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी तालुका पोलीस ठाण्याच्या पथकाला पाच हजारांचे रिवार्ड जाहीर केले
धुळे तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्यासह पथकाने दि.4 डिसेंबर 2022 रोजी मोठी कारवाई केली होती. त्यात ट्रकसह (क्र.एमएच 41/एयु 2124) 95 लाख 77 हजार 800 रुपये किंमतीचा मुद्देमाल व बनावट दारु तयार करण्याची साधने जप्त करण्यात आली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्यातील 10 पैकी 9 आरोपींवर कायदेशीर कारवाई करण्यात आली. मात्र या गुन्ह्यातील मुख्य आरोपी दिनेश निंबा गायकवाड उर्फ दिनू डॉन (रा.शिरुड ता.धुळे) हा गुन्हा घडल्यापासून फरार होता.
तब्बल सात महिन्यांपासून तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रय शिंदे आणि त्यांचे पथक दिनुच्या मागावर होते. पोलिस उपनिरीक्षक अनिल महाजन, पोहेकॉ.प्रविण पाटील, पोना उमेश पवार, कुणाल पाटील यांच्या पथकाने तांत्रिक माहितीच्या आधारे दिनू डॉनचा शोध सुरुच ठेवला होता. दिनू हा सतत मोबाईल सिमकार्ड आणि मोबाईल बदलत होता. गोवा, उत्तरप्रदेश, बिहार या राज्यांसह नेपाळमध्ये देखील त्याचे लोकेशन दिसत होते. त्यामुळे तो पोलिसांच्या हाती लागत नव्हता. तांत्रिक माहितीच्या गंगाखेड (जि.परभणी) येथे दिनू डॉनचे लोकेशन मिळाल्यानंतर तालुका पोलिस ठाण्याचे पथक गंगाखेडला पोहोचले. गंगाखेड शहरातील बसस्थानकाजवळील जगदंबा हॉटेल जवळून दिनूला दि.29 जून रोजी ताब्यात घेतले.
आरोपी दिनू डॉन विरुध्द धुळे जिल्ह्यात तसेच राज्यात आणि इतर जिल्ह्यात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असून अनेक गुन्ह्यांमध्ये तो फरार आहे. त्यांच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. ही कामगिरी पोलिस अधिक्षक संजय बारकुंड, अप्पर पोलिस अधिक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलिस अधिकारी साजन सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे, उपनिरीक्षक अनिल महाजन, पोहेकॉ.प्रविण पाटील, उमेश पवार, कुणाल पानपाटील यांच्या पथकाने केली. या कामगिरीचे वरिष्ठांनी कौतूक केले.