पुणे –
पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणार्या कंटेनर ला राज्य उत्पादन शुल्क विभागाने अडवून अवैध दारू वाहतूक करणार्या कंटेनरमधून
50 लाखांची दारू जप्त केली. मात्र, तळेगाव चाकण रोडवरील राज्य उत्पादन शुल्क कार्यालयातून अधिकार्यांना दमदाटी करून 50 लाखांची दारू सात जणांच्या टोळक्याने कंटेनरसह पळवून नेल्याचे घटना उघड झाली आहे. गुरुवारी पहाटे च्या सुमारास ही घटना घडली असून दुय्यम निरीक्षक योगेश नानाभाऊ फटांगरे यांनी याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य उत्पादक शुल्क विभागाने 29 सप्टेंबर रोजी पुण्याहून मुंबई च्या दिशेने अवैध रित्या दारूची वाहतूक करणार्या कंटेनरवर सोमटने फाटा येथे सापळा रचून कारवाई करण्यात आली होती. उत्पादन शुल्क विभागाने एक कंटेनर ताब्यात घेतला. अवैध दारुसह कंटेनर तळेगाव चाकण रोडवरील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात आणले. 1 ऑक्टोबर रोजी पहाटे एकच्या सुमारास आरोपी उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात आले. आरोपींनी फिर्यादी आणि त्यांच्या पथकाला दमदाटी केली. शिवीगाळ आणि झटापट करून 50 लाखांची अवैध दारू आणि 20 लाखांच्या कंटेनरसह पोबारा केला आहे. या प्रकरणी तळेगाव पोलीस ठाण्यात अज्ञात सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.